दुसरी कोसळण्याच्या मार्गावर
वार्ताहर /गुंजी
गुंजी सरकारी मराठी प्राथमिक शाळेसमोरील उर्दू शाळेला लागून असलेली समाजभवनाची इमारत सोमवारी रात्री कोसळून भुईसपाट झाली. मात्र सदर इमारत रात्रीच्यावेळी कोसळल्याने अनर्थ टळला. ही इमारत गेल्या पंचवीस तीस वर्षांपूर्वी समाजभवन म्हणून बांधण्यात आली होती. असे सांगण्यात येते. परंतु गावाबाहेर दूरवर असल्याने इमारतीचा कोणीही वापर न केल्याने वापराविना आणि कोणत्याही देखभालीविना इमारत मोडकळीस आली होती. शाळा जवळ असल्याने लहान मुले इमारतीच्या सभोवताली सतत खेळत बागडत होती. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने पंचायतीकडे सदर इमारत पाडविण्याची गेल्या दोन वर्षांपासून मागणी होत होती. मात्र पंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर मंगळवारी रात्री इमारत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
गावातील समाज भवनही कोसळण्याच्या मार्गावर
सध्या गावातील हनुमान मंदिरसमोर असलेल्या समाज मंदिराचीही अशीच दुरवस्था झाल्याने ही इमारतही कोसळण्याचा धोका आहे. सध्या या इमारतीच्या भिंतीना भेगा गेल्या असून छतावरील सिमेंटच्या खपल्या पडल्या असल्याने आतील लोखंडी जाळी बाहेर निघालेली दिसत आहे. तरीही अशा धोकादायक इमारतीत पशु दवाखाना सुरूच असून इमारत केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या डॉक्टरासह नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे या इमारतीच्या डागडुजीकडे ग्राम पंचायतीने लक्ष घालावे, अशीही मागणी होत आहे.









