समाधि साधन संजीवन नाम
शांति दया सम सर्वांभूती
उत्तम दर्जाचं फळ पाकात मुरवल्यावर स्वादाची जी अनुभूती देतं, त्याप्रमाणे खोलवर सुखद अनुभूती देणारा यमनचा आविष्कार! हे गीत म्हणजे एक बैठक आहे ज्याच्यापाठी एक चिंतन आहे, ज्याला धीरगंभीरपणा आहे आणि कमालीचा गोडवा आहे. अशा सर्व गोष्टी एकत्रितपणे देणारं हे गीत आहे. बाबूजी सुधीर फडके ही व्यक्ती संगीताच्या क्षेत्रामधली श्रेष्ठतम म्हणावी अशी आहे. त्यामुळे त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याचा आविष्कार हा स्वतंत्रपणे एक उत्तम सांगीतिक दस्तावेजच आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. हे गाणं सुरू झाल्यानंतर एक अद्भुत अशी शांतता, अत्यंत समाधान आणि एक तृप्ती अनुभवायला येते.
संत ज्ञानेश्वर माऊलींचे हे शब्द आहेत. हे शब्द फार सुंदर वाटतात यासाठी की आयुष्यात माणसाच्या जन्माला येऊन जे काय मिळवायचं ते मिळवून झालेलं आहे. सहज समाधीत जाण्याची अवस्था प्राप्त झालेली आहे. मुमुक्षू म्हणून जे अपरंपार कष्ट पडतात त्या कष्टांचा कालावधी आता संपलेला आहे. केलेल्या कष्टांची मधुर फळ चाखायचा काळ आता सुरू झालेला आहे. खरं म्हणजे जे मिळवायचे ते मिळवून झाल्यामुळे आयुष्यात उपभोगायचं असं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. ज्या आनंदासाठी, ज्या समाधानासाठी, ज्या अखंड सुखासाठी माणूस अहोरात्र झटत असतो, त्या अखंड सुखाच्या अवस्थेला पोहोचलेला हा साधक आता सिद्ध झालेला आहे. आणि आता तो तृप्त मनाने, कृतकृत्य झालेल्या अवस्थेत आपल्या गुरूंचे आभार मानतो. आणि परमेश्वराचं नित्य गुणगान करतो इतका खोलवर अर्थ या अभंगाचा आहे.
जे मृत्यूचे भय नष्ट करतं असं संजीवन नाम, जे कलियुगात तरून जाण्यासाठी सर्वात सोपं साधन आहे. नित्य देवाचं नामस्मरण करून मानवाला देवरूप होता येतं. फक्त ते एकचित्ताने न चुकता आणि पूर्ण भक्तिभावाने केलेलं असलं पाहिजे याचा मार्ग जो दाखवतो तो सद्गुरु आणि म्हणूनच अभंगांमध्ये माऊलीने पुढे म्हटले आहे,
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू
हरिनाम उच्चारू दिधला तेणे
समाधी व्यवस्थेला पोहोचल्यानंतरची जी अपार शांती असते तिला नुसतं शांती असं म्हटलेलं नाही. शांतीची पै शांती असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ शांती या संकल्पनेलाही जिथे शांत वाटेल ती उच्चतम शांती! आणि याचा दातारू म्हणजे देणारा कोण? तर संत निवृत्तीनाथ. जे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि गुरुसुद्धा होते. ज्ञानदेवांनाच ज्यांनी ‘हरी मुखे म्हणा’ याचं वळण लावलं ते हे निवृत्तीनाथ होत.
वेदांत दर्शनात ज्यांचा उल्लेख शमदमादि कळा असा केलेला आहे त्या कळा म्हणजेच मनाला सांसारिक विषयांवरून हटवून शांत आणि एकाग्र करणं असतं. भौतिक आणि व्यर्थ जगाकडे एकसारखी धाव घेऊन वेळ सदैव वाया घालवणाऱ्या आपल्या सगळ्या इंद्रियांच्या उधळलेल्या वारूंना आवर घालत एका जागी त्यांना स्थिर करणं असतं. या सर्व गोष्टी ऐकायला फार गोड वाटतात. तसाही वेदांत ऐकायला गोड वाटतोच वाटतो. पण तो आचरणात आणायला मात्र फार कठीण असतो. मग हे जे कठीण असणं ज्यांनी पार केलेलं असतं, अशा प्रशांत तृप्त आणि स्थित असलेल्या एका सिद्ध व्यक्तीचा हा अनुभव आहे. तुकाराम महाराजांनी जे म्हटलं की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता
हा जो अनुभव असतो हा अनुभव सतत घेणाऱ्या व्यक्तीने म्हणूनच इतक्या शांततेने म्हटलेले आहे. आणि ह्या शांत आणि भक्तिरसासाठी यमन पेक्षा जास्त सुंदर राग, यापेक्षा सुंदर भूमी कुठून मिळावी? काही गाणी अशी असतात की जी शांतपणे ऐकावीशी वाटतात. श्रावण महिना चालू आहे.
सर्वत्र वातावरण हे सणावाराचं पूजापाठांचं आहे. पाऊसही विसावा घेत घेत कोसळतोय. फुलं, पत्री, सुगंध यांच्यापैकी कुठल्याच गोष्टीची कमी नाही. निसर्ग सगळं काही भरभरून देतो आहे. मग त्याच्याकडून मिळालेलं त्याला समर्पण करण्याचा हा महिना असतो. मला नेहमी अशी शांत आणि तृप्त गाणी ही श्रावण महिन्याला वाहिलेली आहेत की काय असं वाटतं. आषाढात जी कोसळ असते, जो विस्कळीतपणा असतो, भयंकर आवेश असतो, जीवनाशी जगण्याची किंवा आयुष्य पुन्हा एकदा स्वच्छ करण्याची जी घाई, गडबड, लढाई असते ती श्रावणात शांत झालेली असते. कारण ज्या कामासाठी निसर्ग घनघोर रणसंग्राम करतो ते काम आता झालेलं असतं. मुमुक्षु म्हणजेच ज्याला मोक्ष मिळवण्याची अपेक्षा आहे जो मोक्षाचा प्रार्थी आहे तो मुमुक्षू! या मुमुक्षूच्या जीवनात असाच दु:खांचा उन्हाळा येतो. असाच संकटांचा पावसाळा येतो. दु:खाच्या उन्हाळ्याने थकून गेलेल्या त्याला काहीतरी विश्रांती मिळेल अशी अपेक्षा असताना आधीच दु:खी असलेल्या जीवावर संकटांच्या मालिका कोसळायला लागतात. आषाढासारख्या, विजेच्या कडकडाटासारख्या. आकाशात पावसाळी ढग येतात ते काळ्या रंगाचे असतात. असाच अंधार त्याच्या आयुष्यात येतो.
संकटे आल्यामुळे आधीच दु:खात असलेला तो जीव या संकटांच्या माऱ्याने पार पिचून गेलेला असतो. पण मोक्षाची आस असल्यामुळेच की काय येणारं प्रत्येक संकट त्याला तावून-सुलाखून बाहेर पडण्यासाठी मदत करतं. सोनं हे मुशीत घातलं, त्याचा कस लागला म्हणजेच त्याला झळाळी येते. तसंच संकटांचा जो पाऊस त्याच्यावर पडत असतो त्या पावसात तो स्वच्छ न्हाहून निघतो. त्याच्या मनातले सगळे विकार, चुकीच्या आशा, राक्षसी आकांक्षा, इच्छा एकूणच या भौतिक जगातलं जे मिथ्या चित्र असतं ते धुवून स्वच्छ निघतं. आणि मग या भौतिक जगाच्या मागे असणाऱ्या परमेश्वराचं त्याला दर्शन होतं. तोपर्यंत संकटांच्या असण्याने किंवा नसण्याने विचलित न व्हायला तो शिकलेला असतो. त्याचं आयुष्य आता श्रावणासारखं शांत होतं. कारण तोपर्यंत तो ओळखून चुकलेला असतो की सुख आणि दु:खं, संकटं आणि त्यातून सुटका हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. ती येत राहतात जात राहतात. मग आपल्यात फरक पडायला हवा. तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मनाने शांत संयमी आणि स्थिर राहायला आपण शिकायला हवं. आणि ही शिकवण त्याला मिळते आणि त्याच्या आयुष्याचा कायमसाठी श्रावण होऊन जातो. त्याच्या अंतरात लक्ष दिवे उजळतात आणि आयुष्याचा कार्तिक होऊन जातो. आपले सणवार आपल्या संतांनी सांगितलेले बोल आणि निसर्ग ह्याची अचूकरीत्या सांगड घालून या सनातन धर्माने आपल्याला आयुष्य आदर्श पद्धतीने कसं जगावं हे शिकवलेल आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही.
आणि मग अशा अनुभवसिद्ध संतकवीचे बोल हे पैलतीर गाठल्यानंतरचे अनुभवी बोल असतात. ते म्हणतात ज्ञानदेवांना ज्यामुळे सिद्धी मिळाली त्या साधनेची गोडी अवीट आहे. आणि ‘भक्तिमार्ग नीट’ असं ते म्हणतात. भक्तिमार्ग अनुसरण्यामध्ये सुद्धा नीट असण्याला फार मोठं महत्त्व आहे. अस्ताव्यस्त, कसंतरी, वेडंवाकडं करून कुठलंच काम साध्य होत नाही. म्हणून तर समर्थ रामदास असं म्हणतात ना, की आधी प्रपंच करावा नेटका
मग साधावे परमार्थ विवेका
याचा अर्थ हाच असतो. ज्ञानेश्वर माऊलीला संपूर्ण जगाचा संसार करायचा होता. वसुधैव कुटुंबकम हा मंत्र जपतच ते या पृथ्वीतलावर आले होते. त्यामुळे इतरेजनांसारखा संसार त्यांनी मांडला नसला तरी बोलामागचा आशय लक्षात घेऊनच आपल्या लाडक्या लेकरांच्या संसारातला दुखलंखुपलं, पडलंझडलं त्यांनी पहिल्यांदा पाहिलं. झिजलंविझलं लिंपूनलावून घेतलं. दोन हाताने दिलेलं ज्ञान लोकांना शंभर हातांनी वाटलं. जाता जाता सुद्धा सगळ्या जगासाठी त्यांनी पसायदान मागितलं. आणि समाधी साधन संजीवन नाम या ओळींची सार्थकता, तिचा गारवा, जगावर पांघरून दिला. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सुखाचा श्रावणच म्हणावा तो काही उगीच नाही.
अॅड. अपर्णा परांजपे प्रभु








