शुक्रवारपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन : आज ‘ठकीचं लग्न’कार्यक्रम : शुक्रवारी चंडिका होमनंतर महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : कणखर नात्याला पैशाची नव्हे तर समजुतीची आणि समन्वयाची आवश्यकता आहे. स्त्राr म्हणजे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांचे रूप आहे. त्यामुळे घराचे सौख्य आणि समाधान टिकविणे त्यांच्याच हाती आहे, असे विचार सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी व्यक्त केले. सालाबादप्रमाणे समादेवी जन्मोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे आयोजन स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर कार्यकारी मंडळाचे मोहन नाकाडी, दीपक कलघटगी, रवी कलघटगी, अमित कुडतूरकर, मोतीचंद दोरकाडी, सुदेश पाटणकर, परेश नार्वेकर, रोहन जुवळी, दत्ता कणबर्गी, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, उपाध्यक्षा वर्षा सटवाणी, सचिव वैशाली पालकर आदी उपस्थित होते.
स्वरुपा इनामदार म्हणाल्या, देशाला कशाची गरज आहे हे ओळखून काम करणारा वैश्य समाज होय. समादेवी ही आपल्या सीमेचे रक्षण करणारी देवी. स्त्रियांना देवी स्वरुपच मानले जाते. मानवी जीवनामध्ये लग्न हा महत्त्वाचा टप्पा आहे. स्त्राr जेव्हा विवाहानंतर नव्या घरी प्रवेश करते तेव्हा त्यांच्याकडून अनेक अपेक्षा असतात. मात्र, पती-पत्नीतील नाते परस्पर पूरक असेल तर त्यातून आनंद होतो. नाते संबंध जपण्यासाठी पैशाची नव्हे तर विचार जुळण्याची गरज आहे. मुलांवर संस्कार करण्याची आणि संस्कृती टिकविण्याची जबाबदारी दोघांची असली तरी त्यातील मुख्य भूमिका ही महिलेची आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रारंभी अंजली किनारी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन लक्ष्मी बिडीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उज्ज्वला बैलूर यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार अश्विनी कलघटगी यांनी केला. आभार वैशाली पालकर यांनी मानले. सकाळी चौघडा व काकडारती होऊन कुंकुमार्चन झाले. यानंतर भजन व सत्संग झाला. सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा, श्लोक पठण व भाषण स्पर्धा झाली. बुधवारी सकाळी धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी ‘ठकीचं लग्न’ हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी धार्मिक कार्यक्रमानंतर महाअभिषेक, महानैवेद्य होणार आहे. शुक्रवार दि. 23 रोजी नवचंडिका होम झाल्यानंतर 12 ते 3 महाप्रसाद होणार आहे.









