विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : समादेवी संस्था, वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यावतीने मंगळवार दि. 20 ते शुक्रवार दि. 23 फेब्रुवारीदरम्यान समादेवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 20 रोजी सकाळी चौघडा व काकड आरती, कुंकुमार्चनाने उत्सवाला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते ‘देवी दरबाराचे’ उद्घाटन होईल. त्यानंतर भजन, सत्संग व सायंकाळी विद्यार्थ्यांची वेशभूषा, श्लोक पठण व भाषण स्पर्धा होणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावयाच्या आहेत. बुधवार दि. 21 रोजी सकाळी चौघडा व काकड आरती, पुष्पार्चन, सायंकाळी भजन व 7 वाजता माधव कुंटे यांचा राम गणेश गडकरी लिखित ‘ठकीचं लग्न’ हा धमाल विनोदी कथाकथन कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. 22 रोजी सकाळी चौघडा व काकड आरती, महाभिषेक, महानैवेद्य व त्यानंतर ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा होणार आहे. पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्लीमार्गे समादेवी मंदिर येथे सांगता होईल. रात्री 8 वाजता श्रींच्या भांडारातील देवीला परिधान करण्यात आलेल्या साड्या, खण व देवीसमोरील श्रीफळे यांचा लिलाव केला जाणार आहे. पालखी प्रदक्षिणेनंतर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला चैतन्य प्रदीप ट्रस्टचे अध्यक्ष प. पू. चित्प्रकाशानंद सरस्वती महाराज उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी 6.30 ते 11 वाजेपर्यंत नवचंडिका होम होणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उत्सव कार्यक्रमांमध्ये समाजातील बंधू-भगिनींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.









