वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
व्यवस्थापनाशी झालेल्या मतभेदांमुळे ‘ओपनएआय’ ही कंपनी सोडलेले सॅम अल्टमन यांना पुन्हा सेवेवर घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची आणि व्यवस्थापकीय मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असून मंडळाचे अध्यक्षपद ब्रेट टेलर यांना देण्यात येणार आहे. अल्टमन यांना त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद पुन्हा देण्यात येणार आहे, अशी महिती आहे.
व्यवस्थापकीय मंडळात अमेरिकेचे माजी अर्थमंत्री समर्स यांचीही नियुक्ती केली जाईल. तसेच सध्याचे सदस्य अॅडॅम डीएंजोलो यांनाही पुनर्नियुक्त करण्यात येणार आहे. ही माहिती कंपनीने ‘एक्स’वर दिली आहे. तसेच व्यवस्थापनात आणखीही परिवर्तन करण्यात येत असून त्यासंबंधी माहिती लवकरच प्रसारित केलाr जाईल, असेही प्रतिपादन करण्यात आले आहे. अल्टमन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांकडून दबाव आणण्यात आला होता. तसेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कंपनीने त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.









