रत्नागिरी :
उबाठाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेय की, साळवी यापूर्वी भाजपामध्ये जाणार आणि आता शिवसेनेत येणार अशी चर्चा होतेय. पण जर ते शिवसेनेत येणार असतील तर आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतील असे मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
राजन साळवी हे उबाठाची मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या चर्चेने येथील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालेले आहे. अजूनही साळवी यांनी कोणत्याही इतर पक्षात प्रवेश केलेला नाही. पण याबाबतीत चर्चेवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी नागपूर येथे पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी सामंत म्हणाले की, राजन साळवी हे यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता 13 फेब्रुवारी रोजी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघ हा उबाठाचा बालेकिल्ला मानला जात होता. निवडणुकीपूर्वी साळवी यांना शिवसेना पक्षप्रवेशासाठी मी आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांनीदेखील विनंती केलेली होती. पण साळवी हे काही अडचणींमुळे ते येऊ शकले नसतील. विधानसभा निवडणुकीत साळवी यांचा पराभव माझे मोठे बंधू आमदार किरण सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे आम्हाला सगळ्यांना बसवून योग्य निर्णय घेतील. परंतु सध्या तरी काय निर्णय झालाय हे आपल्याला माहिती नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
- 90 टक्के उबाठा शिंदेंसोबत
माजी आमदार राजन साळवी हे चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अगोदरच शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. रत्नागिरी उबाठाचे जवळपास 90 टक्के पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेंसोबत आहेत. येत्या 15 फेब्रुवारी रोजी येथील दोन माजी आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांचा शिवसेनेतील प्रवेश फायनल झालेला आहे. आम्ही एकनाथ शिंदेंचे आम्ही नेतृत्व मानतो. कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये जी विकासकामे केलीत त्यामुळे विधानसभेला 15 पैकी 14 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. म्हणूनच शिंदेंच्या नेतृत्वात उबाठा येथे कमी करण्यात आम्हाला फार मोठे यश आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.








