या पंधरवडय़ात पितृपक्षाच्या निमित्ताने आपल्या पितरांचा अर्थात पूर्वजांचा उद्धार व्हावा ह्यासाठी धार्मिक विधी केले जात आहेत. काही लोकांना प्रश्न पडतो की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर देह तर अग्निमध्ये अर्पण केला जातो आणि पंचत्वात विलीन होतो मग त्यानंतर सर्व काही संपले तर हे विधी पूर्वजांसाठी करायची काय गरज आहे? यासाठी मृत्यूनंतर काय होते हे भगवतगीतेच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 2.13) देहिनो।़स्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। अर्थात ‘ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱया देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही’. हे स्थत्यंतर कसे होते ह्याचे वर्णन करताना सांगितले आहे (भ गी 15.8) शरीरं यदवाप्नोति यच्च?ाप्युत्क्रामतीश्वरः । गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्। अर्थात ‘ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱया देहात घेऊन जातो. अशा रीतीने, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो.’ शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते असे जे म्हणतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे. जीवात्मा एका देहातून दुसऱया देहामध्ये देहान्तर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पना बरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते.
पुढील श्लोकात हे स्थित्यंतर कसे होते याचे वर्णन आहे (भगी 15.9) श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधि÷ाय मनश्चायं विषयानुपसेवते। अर्थात ‘अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषय समूहाचा उपभोग घेतो.’ जीवात्म्याची चेतना ही निर्मल पाण्याप्रमाणे शुद्ध आहे परंतु पाण्यात विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात त्याप्रमाणे बदल होतो. आपली मूळ भावना ही कृष्णभावना आहे परंतु कोणत्या तरी भौतिक इच्छेने प्रदूषित झाली तर जीवात्म्याला त्याप्रमाणे शरीर धारण करावे लागते. मृत्यूनंतर त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर प्राप्त होईल याची शाश्वती नसते तर कुत्रा, मांजर, डुक्कर, वृक्ष अशा 84 लक्ष योनीपैकी कोणतेही शरीर प्राप्त होऊ शकते. हे उत्क्रमण केवळ आपण ज्ञानाने समजू शकतो. ज्याप्रमाणे विद्युत शक्ती आपण डोळय़ाने पाहू शकत नाही पण वायरच्या आत असलेल्या तारामध्ये ती वाहत आहे हे आपण त्यावर चालणाऱया उपकरणावरून समजू शकतो. हे जसे डोळय़ाने दिसत नाही पण ज्ञानाने आपणाला समजू शकते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये आत्म्याचे अस्तित्व हे ज्ञानाने आपण पाहू शकतो. भगवतगीता सांगते (भगी 15.10) उत्क्रामन्तं स्थितं वा।़पि भुञ्जानं वा गुणान्वितम् । विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। अर्थात ‘जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जणू शकत नाहीत, परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो.’ यामध्ये ‘ज्ञान चक्षुषा’ हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो. पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच वास का करत आहे, हे सर्व काही ज्ञानावाचून मनुष्य जाणू शकत नाही. ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनविले आहे, ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात. त्यांना या वस्तुस्थितीचे मुळीच आकलन होत नाही. पण ज्यांनी या गीतेतील आध्यात्मिक ज्ञानाचा प्रामाणिक गुरुपरंपरेतील गुरुकडून स्वीकार केला आहे, ते पाहू शकतात की, आत्मा हा देहापासून भिन्न आहे. म्हणून म्हटले आहे (भगी 15.11) यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् । यतन्तो।़प्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। अर्थात ‘प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगिजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत’ त्यासाठीच आत्मसाक्षात्कारी हरिभक्तांच्या सान्निध्यात राहून हे ज्ञान मनुष्यजन्मात प्राप्त करणे गरजेचे आहे.
आपला किंवा पितरांचा उद्धार ‘मी आत्मा आहे’ हे केवळ ज्ञान प्राप्त करून होणार नाही तर प्रत्यक्ष ‘आत्मा’ या स्तरावर जगण्याचा प्रयत्न करावयास शिकले पाहिजे. आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि त्यांची सेवा करणे हा त्याचा सनातन स्वभाव आहे. हा विस्मृत संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी हरिनामस्मरण हा मार्ग शास्त्रांनी सांगितला आहे. एकदा हा संबंध स्थापन करण्याची इच्छा प्रगट केल्यावर सर्व काही भगवंतांना अर्पण करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते आणि हळूहळू आपली मूळ कृष्णभावना जागृत होण्यास मदत होते. असे आपले सर्व जीवन हरिभक्ती परायण झाल्यास मृत्यूसमयी भगवंताची आठवण आपणास आली तर आपण ह्या भौतिक बंधनातून कायमचे मुक्त होऊन आपला खऱया अर्थाने ‘उद्धार’ होईल. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात (भगी 8.5) अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भ?ावं याति नास्त्यत्र संशयः। अर्थात ‘आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो. यात मुळीच संशय नाही.’ (भगी 8.6) यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भ?ावभावितः। अर्थात ‘हे कौन्तेय! आपल्या देहाचा त्याग करीत असताना, मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निःसंदेह प्राप्ती करतो.’ जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्त्वगुणी जीवन व्यतीत केले आहे आणि सदैव कृष्णचिन्तन केले आहे त्याला मृत्यूच्या क्षणी वैकुंठाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल.
असा हरिभक्त केवळ स्वतःचाच उद्धार नाही करत तर आपल्याबरोबर 21 कुळांचाही उद्धार करतो. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे (भा 7.10.18) श्रीभगवानुवाच, त्रिःसप्तभिः पिता पूतः पितृभिः सह ते।़नघ । यत्साधो।़स्य कुले जातो भवान्वै कुलपावनः। अर्थात ‘श्रीभगवान म्हणाले, हे परम पवित्र प्रल्हाद! हे निष्पापा! हे साधुपुरुषा! तुझा पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झालेला आहे. तुझा जन्मच या कुळामध्ये झालेला असल्याने हे संपूर्ण कुळ पवित्र झालेले आहे’. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादाला नृसिंगदेव हा आशीर्वाद देत आहेत. ‘त्रिःसप्तभिः’ म्हणजे एकवीस होय. मनुष्य चार किंवा पाच पिढय़ापर्यंत आपल्या कुळाची गणना करू शकतो, पण भगवंतांनी या ठिकाणी एकवीस पिढय़ांचा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांनी दिलेला वर इतर भक्तांच्या कुळांनाही लागू पडतो. त्यामुळे वैष्णवांचा एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा जन्म होतो, तेव्हा भगवत्कृपेने तो केवळ त्याच कुळाचा नव्हे तर पूर्वजन्मातील अन्य कुळांचाही उद्धार करतो. पितृपक्षामध्ये यापेक्षा आपल्या पूर्वाजांचा अर्थात पितरांचा भौतिक जगातून मुक्त होऊन वैकुंठापर्यंत उद्धार हरिभक्तीशिवाय आणखी कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही
-वृंदावनदास








