अध्याय अठ्ठाविसावा
साधकाचा योगाभ्यास एकाच जन्मात पूर्ण होईल असे सांगता येत नसल्याने त्याबद्दल बोलताना भगवंत उद्धवाला म्हणाले, जो अत्यंत निगुतीने योगाभ्यास करतो त्याची परमार्थ साधनेत येणारी विघ्ने जळून भस्म होतात. प्रारब्धामुळे जर योग्याच्या साधनेत व्यत्यय आला आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला तरी तो कर्माच्या आधीन झालेला नसल्याने, त्याला चांगलीच गती मिळते. योग्याच्या इच्छेनुसार त्याला कुलीन संपन्न घराण्यात पुनर्जन्म मिळतो आणि यथावकाश त्याचा अपुरा राहिलेला योगाभ्यास पुढे सुरु होतो किंवा योग्याच्या इच्छेनुसार त्याला योगसाधना करणाऱ्यांच्या कुळात त्याचा पुनर्जन्म होतो आणि त्याची योगसाधना बालपणीच पुढे सुरू होते व त्याला मोक्षप्राप्ती होते. जो योगी साधना करत असताना माझी भक्ती करत असेल तो अणुमात्रही कशात गुंतत नाही कारण मी भक्तांचा कैवारी श्रीपती सदैव जागृत राहून अहोरात्र माझ्या भक्तांना मोहापासून दूर ठेवत असतो. माझी भक्ती केल्यामुळे मोठमोठ्या विघ्नांचा चकणाचूर होतो. अर्थात योगाभ्यास करत असताना सर्व योगी माझी भक्ती करत असतीलच असे नाही. समजा एखादा योगी माझी भक्ती करत नसेल किंवा माझे भजन करत नसेल तरी तो पूर्व संस्कारामुळे संपूर्ण निरपेक्षतेने कर्मे करून कर्मयोगाचे आचरण करत असल्याने त्यालाही चांगली गती मिळते. कर्म करत असताना जे स्वत:ला कर्ता समजत नाहीत त्यांना ह्याच जन्मात जीवनमुक्ती मिळत असते. असे जे जीवनमुक्त आहेत, त्यांना पुनर्जन्म जरी नसला तरी ह्या जन्मात प्रारब्धानुसार त्यांच्याकडून कर्मे होत असतातच. त्यामुळे योगी कर्मत्याग करतात असे म्हणणे चुकीचे आहे. ते प्रारब्धानुसार वाट्याला आलेली कर्मे करत असतातच. फक्त त्या कर्मांचे फल त्यांना मिळून त्यातून काही लाभ होईल असा दृष्टीकोन ते बाळगत नसल्याने त्यांनी केलेल्या कर्मातून निर्माण होणारे पाप, पुण्य त्यांना बंधनात जखडत नाही. जीवनमुक्ताला मिळणारे मोक्षपद हेच साधकाचे मुख्य ध्येय असते. त्यामुळे साधक माझी भक्ती करत असो वा नसो दोन्ही परिस्थितीत त्याला कर्मबंधन बाधत नाही. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे योगी स्वत:ला कधी कर्ता समजत नाही. त्यामुळे त्याला अहंकार होत नाही. ज्याला आपण कर्ता नाही ह्याची जाणीव असते त्याला पापपुण्याची गाठोडी त्रास देत नाहीत कारण त्याने तो करत असलेल्या कर्माचे फल मला अर्पण करून टाकलेले असते. जन्मापासून मरणापर्यंत प्राणी जेजे कार्य करतो ते ते त्याला पूर्वकर्मानुसार प्राप्त होत असते. त्यापैकी जे अज्ञानी असतात ते मी कर्ता आहे ह्या अहंकाराने कार्य करत असतात तर जे सज्ञानी असतात त्यांना आपण कर्म करतो असा अहंकार कधीच होत नाही. तू कदाचित म्हणशील की देह स्वत: हालचाली करून कर्म करतो आहे हे स्पष्टपणे दिसत असताना ज्ञानी माणसाला देहाभीमान होत नाही असे कशाच्या आधाराने म्हणता येईल? तुझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर असे की, जो ज्ञानी असतो तो स्वसुखाच्या अनुभवाने परिपूर्ण असल्याने त्याला अहंकार आणि कर्तेपणाचे स्फुरण होत नाही. सर्परज्जू सिद्धांताचा तत्वज्ञान समजून देताना बऱ्याचवेळा विद्वान उपयोग करून घेतात. भगवंतानी ह्याच सिद्धांताचा आधार घेऊन ज्ञानी माणसाला अहंकाराची आणि कर्तेपणाची बाधा का होत नाही हे उद्धवाला समजावून सांगितले आहे. ते म्हणतात, उद्धवा जोपर्यंत दोर अंधारात असतो तोपर्यंत हा महासर्प आहे अशी खात्री वाटून त्याचा महाधाक वाटत असतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी एक म्हणही प्रचलित आहे. तिचा अर्थ असाच आहे. जेव्हा दोरावर प्रकाश पडलेला असतो तेव्हा त्याचे भय वाटत नाही. त्याचप्रमाणे ज्याने ब्रह्मसुखाचा अनुभव घेतला आहे त्याच्या हे लक्षात आलेलं असतं की हे सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असून स्वत:च अस्तित्व आणि मी कर्ता आहे ह्या दोन्ही गोष्टी अंधारात दोरीच्या जागी दिसलेल्या महासर्पाप्रमाणेच मिथ्या आहेत. मग त्याला अहंकाराची बाधा होण्याचा प्रश्नच उरत नाही.
क्रमश:








