तमाम मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना रविवार दि. 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात येणार आहे.
सीमाभागातील मराठी भाषा संपविण्यासाठी शाळांमध्येच कन्नड सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात सीमाभागातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. यामुळेच 1 जून 1986 रोजी राणी चन्नम्मा चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. पवार यांच्या अटकेमुळे या आंदोलनाला उग्र रूप मिळाले आणि मराठी भाषिकांचा रोष सरकारला पत्करावा लागला.
शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला आणि याला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. यामध्ये एकूण 9 सीमावासियांना हौतात्म्य मिळाले. याची जाणीव ठेवून दरवर्षी 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी सुसज्ज असे स्मृती भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या पद्धतीने काम सुरू आहे. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही, यासाठी त्यांच्या स्मृती जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. 1 जून रोजी होणाऱ्या अभिवादनाच्या कार्यक्रमाला सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.
रविवारी होणाऱ्या या आंदोलनावेळी तालुका म. ए. समिती, शहर म. ए. समिती, खानापूर म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, तालुका महिला आघाडी, तालुका युवा आघाडी, शिवसेना यासह इतर घटक समित्यांनी आवाहन केले असून अभिवादनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादनासाठी उपस्थित रहा
बेळगाव
कन्नडसक्ती विरोधी आंदोलन 1 जून 1986 रोजी झाले होते. या आंदोलनावेळी निष्पाप सीमावासियांना आपला जीव गमवावा लागला. या हुतात्म्यांना रविवार दि. 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता मराठी भाषिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांनी केले आहे.









