वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि त्यावेळच्या म्हैसूर राज्यात मराठी बहुभाषिक सीमाभाग अन्यायाने डांबण्यात आला. यामुळे सीमाभागात उद्रेक झाला. यामध्ये अनेक हुतात्मे झाले. त्यामध्ये कंग्राळी खुर्द गावचे पैलवान मारुती बेन्नाळकर यांचा समावेश आहे. सीमाभाग जेव्हा महाराष्ट्रात सामील होईल तेव्हाच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर, काश्मीरचा 370 कलम हटविला. त्याप्रमाणे हा प्रश्न सोडवून लाखो सीमावासियांना न्याय देण्याचे विचार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
कंग्राळी खुर्द येथे शुक्रवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कंग्राळी खुर्द गावच्या वेशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन म. ए. समिती नेते आर. एम. चौगुले व युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर यांनी केले. यावेळी हुतात्मा बाळू निलजकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या फलकाचे पूजन जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. माजी सदस्या कमल मन्नोळकर यांच्या हस्ते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलकाचे पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्षा रुक्मिणी निलजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविकमध्ये सीमावासीय 1956 पासून सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी झगडत आहेत. 68 वर्षांपासून 17 जानेवारीला हुतात्म्यांना आदरांजली वाहत आहोत. परंतु आता सीमाप्रश्न सुटल्यावरच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगून हुतात्मा दिन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पौर्णिमा पाटील म्हणाल्या, कर्नाटक सरकारने सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला आहे. तसेच मराठी भाषिकांवर अत्याचार करण्याचे सत्र सुरूच आहे. तेव्हा मराठी भाषिकांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत एकीने लढा देणे गरजेचे आहे.
आर. एम. चौगुले म्हणाले, सध्या मराठी भाषिकांवरील कर्नाटक सरकारचे होणारे अत्याचार पाहता सीमाप्रश्न सुटणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र सरकारनेही सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमावासियांच्या पाठीशी राहून सहकार्य करणे गरजेचे आहे. लक्ष्मण होनगेकर म्हणाले, आम्ही मराठी भाषिकांनी आपापसातील मतभेद विसरून एक होऊन येत्या ता. पं., जि. पं. निवडणुकीमध्ये आमच्या मराठी उमेदवारांना निवडून आणून मराठी बाणा दाखविण्याचे आवाहन केले. शिवसेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर म्हणाले सीमाप्रश्नासाठी शिवसेनेनेही 67 हुतात्मे दिले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या आमिषाला बळी न पडता सर्वांनी एकीने सीमाप्रश्न सोडवून घेऊया आणि हीच खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगितले.
लक्ष्मी बेन्नाळकरांना मदतीचा आधार
अभिवादन कार्यक्रमाचे औचित्य साधून हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी यांच्या आजारावर उपचारासाठी म्हणून यावेळी अनेक समिती नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भरीव मदत दिली. ही मदत पौर्णिमा पाटील यांनी लक्ष्मी बेन्नाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्याचे सांगण्यात आले. यावेळी शाहीर बाबू पाटील यांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या जीवनावर पोवाडा गायीला. याप्रसंगी अॅड. सुधीर चव्हाण, मल्लाप्पा पाटील, शंकर कोनेरी, सुरेश राजूकर, रावजी पाटील, अॅड. सतीश बांदीवडेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. आय. पाटील, सी. एम. पाटील, दिनेश मुतगेकर, संभाजी पाटील, बाबू पावशे, यल्लाप्पा कुद्रेमनीकर, चेतन पाटील, सी. एम. पाटील, बाळ बसरीकट्टी, सूरज निलजकर, जोतिबा पाटील, किसन पाटील, केदार पाटील, आर. के. पाटील, शिवाजी कुट्रे, मनोहर हुंदरे, विष्णू मुतगेकर, भाऊ तुडयेकर, परशराम निलजकर, महादेव कंग्राळकर, यल्लाप्पा पाटील, विलास देवगेकरसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









