माणसा मधली माणुसकी
माणसाने जपली जावी
आपापसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी
आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्याने मात पाहिजे
माणसाकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे ……
कट्टा / प्रतिनिधी
हाच माणुसकीचा ओलावा दिलीप गुराम यांच्या कृतीतून जाणवला. दिलीप गुराम ,गुरामवाडी (सध्या मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी मधील होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील कै. भाऊ गुराम यांचे स्मरणार्थ दोन वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी रुपये 15000/ चे मौलिक सहकार्य केले. कु. सिद्धी हिला मार्च 2023 मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 80 टक्के गुण मिळाले असून अतिशय नम्र अशी ही विद्यार्थिनी आहे. तिच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्याने तिच्या आईने व कुटुंबीयांनी श्री दिलीप गुराम यांचे मनोमन आभार मानले.
श्री गुराम यांच्या सहकार्याबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही शाळेसाठी बहुमोल सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
माजी तंटामुक्ती अध्यक्ष व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्य माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान पदाधिकारी श्री सुनील गुराम यांनी श्री दिलीप गुराम यांना वराडकर हायस्कूल मधील विद्यार्थीनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री दिलीप गुराम यांनी सिद्धीला सहकार्य केले. श्री दिलीप गुराम यांनी यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचा शाल,श्रीफळ ,भेटवस्तू देऊन सन्मान केला.









