शहरातील मूकफेरीत सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या लढ्यासाठी मागील 68 वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्यातील आंदोलनात अनेक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना बुधवार दि. 17 रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या मुख्य भागातून मूकफेरी काढली जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने सीमावासियांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. बेळगाव शहरासह निपाणी, खानापूर, कारवार, बिदर, भालकी येथील मराठी भूभाग कानडी प्रांताला जोडण्यात आला. यामुळे मराठी भाषिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. नागरिकांची इच्छा नसतानाही कन्नड प्रांतात डांबण्यात आल्याने प्रचंड प्रक्षोभ उफाळला. यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेकांना हौतात्म्य आले. तर काहीजणांनी कारागृहामध्ये अखेरचा श्वास घेतला. यामध्ये मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांना हौतात्म्य आले. तर 8 फेब्रुवारी 1969 रोजी शिवसेनेने 68 हुतात्मे दिले. 1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात 9 जण हुतात्मे झाले. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी प्रतिवर्षी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होतो. हुतात्मा चौक येथे अभिवादन केल्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवर मूकफेरी काढली जाते. या मूकफेरीमध्ये सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, युवा समिती, महिला आघाडी, युवा आघाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
हुतात्मा दिनानिमित्त आज रक्तदान शिबिर
हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये यासाठी प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गोवावेसचा राजा मंडळातर्फे मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. बुधवार दि. 17 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 यावेळेत रामलिंगवाडी, गोवावेस येथील सिद्धिविनायक मंदिरात रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोवावेसचा राजा मंडळातर्फे करण्यात आले आहे.









