लाल किल्ल्यावर रंगीत तालीम सुरू : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रभावीपणे वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत वाजेल. याचदरम्यान 21 तोफांची सलामी सुरू होईल. राष्ट्रगीताच्या 52 सेकंदांसाठी 8 तोफांमधून 21 राउंड फायर केल्या जातील. ही सलामी यंदा 105 मिमी लाईट फील्ड गनमधून दिली जाणार असून यासाठीची रंगीत तालीमही सुरू झाली आहे. 2023 पासून ब्रिटिश 25 पौंडर तोफांऐवजी स्वदेशी तोफांचा वापर केला जात आहे. मात्र, यंदा त्यात बदल करून ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रभावीपणे भूमिका बजावलेल्या स्वदेशी 105 मिमी लाईट फील्ड गनचा वापर केला जाणार आहे.
कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभातही ब्रिटिश 25 पौंडरऐवजी स्वदेशी 105 मिमी लाईट फील्ड गन बॅटरीने सलामी दिली जाते. याशिवाय, भारतात येणाऱ्या सर्व विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ दिली जाणारी 21 तोफांची सलामी 105 मिमी लाईट फील्ड गनने दिली जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय फील्ड गनने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. 1982 पासून ही लाइट फील्ड गन सैन्यात समाविष्ट करण्यात आली आहे. 105 मिमी फील्ड गनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती वजनाने हलकी आहे. ती उंचावरील भागात सहजपणे तैनात करता येते. त्यामुळे या तोफा पाकिस्तान आणि चीनच्या आघाडीवर तैनात करण्यात आल्या आहेत. 105 मिमी फील्ड गनची कमाल रेंज 17 किलोमीटर आहे. ती आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.









