वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 119 वी जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाटावर श्र्रद्धांजली वाहिली. गांधी परिवार आणि इतर नेतेही महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी राजघाटावर पोहोचले होते. दिल्लीबरोबरच अन्य राज्यांमध्येही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर जाऊन बापूंना नमन करून आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी विजयघाटावर लालबहादूर शास्त्री यांना श्र्रद्धांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राजघाटावर बापूंना पुष्पांजली वाहिली. दिल्लीचे लेफ्टनंट जनरल व्ही. के. सक्सेना यांनीही राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.









