घरोघरी राबविणार मोहीम : गाय, बैल, म्हशींना टोचणार लस : सहकार्य करण्याचे पशुपालकांना आवाहन
बेळगाव : राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 26 सप्टेंबरपासून लाळ्याखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. घरोघरी जाऊन चार वर्षावरील जनावरांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यापैकी गाय, म्हैस, बैल आणि लहान वासरांना ही लस दिली जाणार आहे. ‘लम्पी’ रोगामुळे यंदा लाळ्याखुरकत लसीकरण मोहिमेला उशीर झाला आहे. मात्र, आता अधिक तीव्रपणे ही मोहीम राबविली जाणार आहे. शिवाय एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहितीही पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यांना लसीकरणाचा पुरवठा
लाळ्याखुरकत विषाणूजन्य रोगाची लागण झाल्यास जनावराच्या जिभेला पुरळ उठून जखमा होतात. रोग अतिप्रमाणात असल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्यामार्फत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘लम्पी’ रोगामुळे गतवर्षी पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खात्याने खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम तीव्रपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात 15 लाखांहून अधिक गाय, म्हैस आणि बैलांची संख्या आहे. या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांना लसीकरणाचा पुरवठा करण्यात आला आहे.
वर्षातून दोन वेळा लाळ्याखुरकत लसीकरण मोहीम
गतवर्षी लम्पीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला होता. त्यामुळे लसीकरणात अडचणी आल्या होत्या. मात्र, यंदा वेळेत लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्षातून दोन वेळा लाळ्याखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाते. सप्टेंबर दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यातील लाळ्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे.
एकही जनावर वंचित राहणार नाही याची काळजी घ्या
जिल्ह्यात मंगळवारपासून लाळ्याखुरकत लसीकरण मोहिमेला प्रारंभ होत आहे. चार वर्षावरील सर्व जनावरांना ही लस दिली जाणार आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. त्याबरोबर पशुपालकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन)