वृत्तसंस्था/ मुंगयाँग (द. कोरिया)
आशियाई हॉकी फेडरेशनतर्फे भारतीय हॉकी संघातील मध्यफळीत खेळणारी महिला हॉकीपटू सलिमा टेटेची 2022 च्या हॉकी हंगामातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. शुक्रवारी येथे आशियाई हॉकी फेडरेशनच्या झालेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये सलिमा टेटेचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दक्षिण कोरियामध्ये आशियाई हॉकी फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर वार्षिक पुरस्कार बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता. 2022 च्या हॉकी हंगामामध्ये सलिमा टेटेची कामगिरी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार झाल्याने तिची सर्वोत्तम उदयोन्मुख हॉकीपटूसाठी आशिया हॉकी फेडरेशनने निवड केली. या समारंभामध्ये सलिमा टेटेने आशियाई हॉकी फेडरेशनचे या पुरस्काराबद्दल आभार मानले आहेत.
गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात मस्कत येथे झालेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत सलिमा टेटेने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले होते. गेल्या दोन वर्षांपासून सलिमाने राष्ट्रीय संघातील आपले स्थान अबाधित ठेवले आहे. 2016 साली सलिमाने भारताच्या वरिष्ठ महिलांच्या हॉकी संघात प्रथम प्रवेश मिळविला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हॉकी कसोटी मालिकेत सलिमा टेटेने भारतीय संघाकडून दर्जेदार कामगिरी केली होती. 2018 साली अर्जेंटिनामध्ये झालेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने रौप्यपदक पटकाविले होते. या संघामध्ये सलिमा टेटेने चांगली कामगिरी केली होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघामध्ये सलिमाचा समावेश होता.









