अखिलेश यादव यांना आणखी एक झटका
वृत्तसंस्था/ लखनौ
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना सतत राजकीय धक्क्मयांचा सामना करावा लागत आहे. अलिकडेच सपाचा मोठा दलित चेहरा स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आणखी एक शक्तिशाली नेते सलीम इक्बाल शेरवानी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. इक्बाल यांच्या पक्षत्यागामुळे अखिलेश यादव यांच्या पीडीए (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) आघाडीचे नुकसान होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सलीम इक्बाल शेरवानी हे समाजवादी पक्षाचे (एसपी) ज्येष्ठ मुस्लीम नेते आहेत. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर मुस्लिमांची उपेक्षा केल्याचा आरोप केला असून त्यांनी पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. इक्बाल शेरवानी यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना लिहिलेल्या पत्रात आम्ही लवकरच आमच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेणार आहोत, असे कळवले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सपाने तीन उमेदवारांची घोषणा केली, परंतु त्यामध्ये एकही मुस्लीम नेत्याचे नाव समाविष्ट नाही. माझ्या नावाचा विचार करण्यात आला नसला तरी एकातरी मुस्लिमाला जागा मिळायला हवी होती, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.









