अन्य तिघांनी घेतली अटकपूर्व जामीनासाठी धाव
मडगाव : मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ अॅटर्नी तयार करून मडगाव येथील एका वृद्ध कपड्याच्या व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणी हा अद्याप फरारी असून मडगाव पोलीस त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन संशयीत राजदीप कुंडईकर, महमद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून आज 15 रोजी त्यांच्या अर्जावर मडगाव सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी मडगाव पोलीसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण 5 जणांवर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, महमद सालेह मुसा या मडगाव येथील कपड्याच्या व्यापाऱ्याचे दवर्ली येथील दोन प्लॉट सलीम आणी राजदीप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेऊन बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे ललनवार आणि धलायत यांना विकले. यासाठी एका मृत नोटरीच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणी आपल्याला अटक होईल या भितीने सध्या त्यांनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
दोडामणीच्या विरोधात आणखीन एक तक्रार
या जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड सलीम दोडामणी या विरोधात याच्या प्रकरणात अफरातफरीचा गुन्हा नोंद झालेला असतानाच मडगाव पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात अशाचप्रकारे कागदपत्रांचा फेरफार करून नावेली येथील एका व्यावसायिकाची गाडी बनावटगिरी करून आपल्या नावावर हस्तांतरीत केल्याची तक्रार देण्यात आली आहे.









