3 लाख 34 हजार वाहनांची विक्री : मारुती सुझुकी आघाडीवर : दुचाकी विक्रीत होंडा मोटरसायकलची चमक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मे महिना हा चांगला गेला आहे. मे महिन्यामध्ये देशांतर्गत पातळीवर 3 लाख 34 हजार 802 प्रवासी वाहनांची विक्री करण्यात आली आहे. सेमिकंडक्टर चिपच्या योग्य पुरवठ्यामुळे आणि वाढत्या मागणीमुळे प्रवासी वाहनांची विक्री वाढीव दिसून आली आहे. यामध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयुव्ही वाहनांचा वाटा अधिक राहिला आहे.
याआधीच्या वर्षांकडे पाहता 2018 मध्ये मे महिन्यात 3 लाख 1 हजार 238 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. चिपच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मध्यंतरी कार उत्पादनावर परिणाम जाणवला होता. परंतु अलीकडच्या काळात सेमिकंडक्टर चिपचा पुरवठा नियमित होत असल्याने याचा सकारात्मक परिणाम कार उत्पादनावर दिसून आला. पण इर्टिगा, एक्सएल 6, ब्रिझा, ग्रँड व्हिटारा आणि फ्राँग्स यासारख्या वाहनांचे उत्पादन मात्र अजुनही काहीसे प्रभावित राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मारुती सुझुकीची दमदार कामगिरी
मारुती सुझुकीच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मे महिन्यात 15 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. कंपनीच्या 1 लाख 43 हजार 708 वाहनांची विक्री मे महिन्यात झाली होती. मारुती कंपनीच्या इतर वाहनांच्या तुलनेमध्ये एसयुव्ही वाहनांचा वाटा 21 टक्के इतका लक्षणीय वाढलेला दिसला आहे. जो मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 12 टक्के इतका होता. देशांतर्गत वाहनांच्या बुकींगमध्ये मे मध्ये वर्षाच्या आधारावर पाहता 10 टक्के इतकी वाढ नेंदली गेली आहे.
अन्य कंपन्यांची विक्री
दुसरीकडे ह्युंडाईच्या मे मध्ये 15 टक्के वाढीसह 48 हजार 601 वाहनांची विक्री झाली आहे. एसयुव्ही गटातील कंपनीच्या क्रेटा व वेन्यू या वाहनांना ह्युंडाईच्या ग्राहकांनी मे मध्ये पसंती दर्शवली होती. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये 22 टक्के वाढ झाली असून 32 हजार 886 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वाहन विक्रीत दुप्पट वाढ नोंदली गेली आहे. 20 हजार 410 वाहनांची विक्री टोयोटाने मे मध्ये केली आहे.
दुचाकी विक्रीतील आकडेवारी
तर दुचाकी वाहन निर्माती कंपनी टीव्हीएस मोटर्सने 2 लाख 52 हजार 690 वाहनांची विक्री मे मध्ये केली आहे. मागच्या वर्षी मे मध्ये 1 लाख 91 हजार 482 दुचाकींची विक्री करण्यात आली होती. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांनी वाहन विक्रीत मे महिन्यात 6 टक्के घट दर्शवली आहे. मे महिन्यामध्ये 3 लाख 29 हजार 393 वाहनांची विक्री करण्यात आली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे कंपनीने 18 हजार 249 वाहनांची निर्यात केली आहे. निर्यातीत मात्र घट नोंदवली गेली आहे.