मार्चमध्ये 2 लाख 79 हजार वाहनांची विक्री : दुचाकी वाहन विक्रीही प्रभावीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या मार्चमध्ये देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये चार टक्के घट दिसून आली आहे. मार्चमध्ये एकंदर 2 लाख 79 हजार 501 प्रवासी वाहनांची विक्री देशभरात झालेली आहे. मार्च 2021 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 2 लाख 90 हजार 939 इतकी झाली होती. सदरची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात एसआयएएम या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे.
मार्चमध्ये दुचाकी वाहनांची विक्री 21 टक्क्यांनी घटून 11 लाख 84 हजार 210 वर राहिली आहे. मार्च 2021 चा विचार करता दुचाकी वाहन विक्री 14 लाख 96 हजार 806 इतकी राहिली होती.
मोटारसायकल, स्कूटर्स विक्रीही कमीच
दुसरीकडे मोटारसायकलची विक्री ही 21 टक्क्यांनी घटून 9 लाख 93 हजार 996 वर घसरली आहे. स्कूटर्सची विक्रीही 21 टक्के घटून 3 लाख 60 हजार 82 वर घसरली आहे. एक वर्षाआधी समान महिन्यामध्ये दुचाकी कंपन्यांनी 4 लाख 58 हजार 122 स्कूटर्सची विक्री केली होती.
आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांची विक्री अधिक
एकंदर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 13 टक्के वाढत 30 लाख 69 हजार 499 वर पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ही विक्री 27 लाख 11 हजार 457 इतकी होती. मागच्या आर्थिक वर्षामध्ये दुचाकींची एकूण विक्री 11 टक्के घटल्याची बाबही समोर आली आहे. आर्थिक वर्षामध्ये तिचाकी वाहनांची विक्री वाढून 2 लाख 60 हजार 995 वर पोहोचली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षामध्ये ही विक्री 2 लाख 19 हजार 446 इतकी होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 5 लाख 68 हजारवरून 7 लाख 16 हजारावर पोहोचली आहे.









