वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकंदर सात लाख 30 हजारहून इलेक्ट्रिक दुचाकीची विक्री झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिकने दुचाकी विक्रीमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रत्येक महिन्याला जवळपास 60 हजार इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी 75 टक्क्यांपेक्षा अधिक राहिल असा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेमध्ये पाहता 2023 आर्थिक वर्षातील दुचाकीची विक्री जवळपास तिप्पट राहिली आहे. ओला इलेक्ट्रिकने आर्थिक वर्षामध्ये भारतीय बाजारात 22 टक्क्यांचा वाटा काबीज केला आहे. मार्च तिमाही अखेर कंपनीचा वाटा 30 टक्क्यापर्यंत वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कंपनीने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती केली जात असून सदरची दुचाकी ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे कंपनीचे सर्वेसर्वा भावीश अगरवाल यांनी म्हटले आहे.
या गोष्टी वाढीस कारणीभूत
इंधनाच्या किमतीत झालेली वाढ त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत वाढलेली जागरुकता तसेच इलेक्ट्रिक दुचाकी चालवण्याबाबत वाढलेली सुरक्षितता या गोष्टी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढीस कारणीभूत ठरत आहे.









