एसडीपीआय संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : संपूर्ण मद्यपान निषेध करणे हे महात्मा गांधींचे मोठे स्वप्न होते. मात्र राज्यातील सरकार गावागावात मद्य विक्रीला परवानगी देवून गांधीजींचे स्वप्न उद्ध्वस्त करीत आहे. राज्य सरकारने मद्य विक्रीसाठी परवानगी देवू नये. संपूर्ण मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी करत सोशियल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधीजींनी ग्राम विकासाचा नारा दिला होता. भारत देश गावांमध्ये वसला आहे. यासाठी गावांचा विकास करावा, असा संदेश दिला आहे. मद्यपानाला गांधीजींचा नेहमीच विरोध राहिला आहे. असे असताना राज्यातील काँग्रेस सरकार गावागावात मद्य विक्री करण्यासाठी परवानगी देत आहे. त्यामुळे या सरकारला गांधी जयंती साजरी करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. व्यसनाधिन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींमुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. समाजात अशांतता निर्माण करण्यास मद्यपान कारणीभूत आहे. यासाठी सरकारने निर्णय मागे घ्यावा. मद्यपान विक्रीवर निर्बंध आणावेत. अशी मागणी एसडीपीआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारच्या धोरणाचा विरोध केला. गावामध्ये मद्य विक्रीसाठी परवानगी देऊ नये अशी मागणी केली.









