मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था/ भोपाळ
बिहार आणि उत्तरप्रदेशनंतर आता मध्यप्रदेशातही मद्यविक्रीवर बंदी लागू होऊ शकते. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनीच केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळी मद्यविक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर विचार केला जात आहे. लवकरच यावर ठोस पाऊल उचलले जाईल असे यादव यांनी सांगितले आहे.
आम्ही लवकरच मद्यविक्रीवर बंदीची घोषणा करू शकतो. याकरता काम सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्याने अबकारी धोरणात बदल केला जाऊ शकतो. मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी संतांनी केली होती. याचमुळे यासंबंधी विचार केला जात असल्याची माहिती यादव यांनी दिली आहे.
आमचे सरकार मद्यविक्रीवरील बंदीवरून अत्यंत गंभीर आहे. धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी मद्यविक्रीवर बंदीचा निर्णय लागू केला जाणर आहे. केवळ धार्मिक क्षेत्रे आणि मंदिरांच्या क्षेत्राबाहेरील शहरांमध्येच मद्यविक्री करता येणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.









