केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहानांकडून कारवाईचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बनावट खते-बीज आणि कीटकनाशकाच्या विक्रीप्रकरणी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्र्यांनी सोमवारी बैठक घेत बनावट खते-बीज आणि कीटकनशाके विकणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेतकऱ्यांचे पीक खराब होण्याचा प्रकार सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावा. अधिकाऱ्यांनी याप्रकरणी व्यापक छापे टाकत शेतांमध्ये जात पाहणी करण्याची गरज आहे. बनावट खते-बियाणे आणि कीटकनाशकांमुळे विविध जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकरी त्रस्त आहेत. रविवारीच मी एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन स्थितीची पाहणी केली आहे. बाजारात खराब गुणवत्तेच्या किंवा बनावट कृषी औषधे, खते-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी असे शिवराज सिंह यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच यासंबंधी आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेत शिवराज यांनी बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी अभिशात असल्याचे वक्तव्य केले आहे.
कृषी विभागाने राज्य सरकारांसोबत मिळून शेतांमध्ये जात चौकशी करावी आणि अभियान राबवून व्यापक प्रमाणावर छापे टाकावेत. बनावट खते, औषधांचे नमुने आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. खते, बियाणे आणि कीटकनाशकांप्रकरणी ज्या कंपन्या गैरप्रकार करत आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. या कारवाईमुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. संबंधित कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताकरता कठोर कारवाई करणे आमचा धर्म आहे. जर कुठे चुकीचे घडत असेल तर ते रोखणे आमचे कर्तव्य असल्याचे शिवराज सिंह यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घ्या
कृषिमंत्री शिवराज यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासोबत पूर्ण तोडगा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी राज्य सरकारांसोबत चर्चा करत शेतकऱ्यांच्या प्रकरणी पूर्ण संवेदनेसह प्रभावी कारवाई करण्यात यावी. तर यासंबंधी शेतकऱ्यांदरम्यान जागरुकतेचा प्रचारही व्यापक स्वरुपात करण्याचे दिशानिर्देश शिवराज यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.









