बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी महोत्सव : पर्यावरणप्रेमींचा भरघोस प्रतिसाद : उत्सवाची सांगता
बेळगाव : बागायत खात्यामार्फत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वनस्पती महोत्सवात तब्बल 43 हजार रोपांची विक्री झाली आहे. पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे खात्याने समाधान व्यक्त केले आहे. बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खात्यामार्फत वनस्पती महोत्सव भरविण्यात आला होता. या महोत्सवात विविध जातींच्या फळा-फुलांची रोपे, बी-बियाणे, शोभिवंत झाडे प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. याबरोबरच आंबा, चिकू, फणस, सीताफळ, काजू, पेरू, डाळिंब, नारळ यासह गुलाब, पाम, जास्वंदी, मोगरा आदी जातीची रोपे सवलतीच्या दरात देण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते या बागायत महोत्सवाला चालना देण्यात आली होती. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी खरेदीसाठी नागरिकांचा ओघ वाढला होता. त्यामुळे 43 हजार रोपांची विक्री झाली आहे.
याबरोबरच या महोत्सवात पामतेल झाडे, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, मध आणि अळंबी उत्पादनाबाबत प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. शंभर रुपयांपासून अळंबी उत्पादनाला सुरुवात करता येते. त्यामुळे निरुद्योगी महिला आणि तरुणांनी अळंबी उत्पादन करून अर्थार्जन करावे, असे आवाहन बागायत अधिकाऱ्यांनी केले आहे. बागायत खात्यामार्फत दरवर्षी पावसाळ्यात रोपबाजार भरवून विविध रोपांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते. गतवर्षी तब्बल 90 हजार रोपांची विक्री झाली होती. यंदादेखील समाधानकारक विक्री झाली आहे. विशेषत: एकाच छताखाली विविध रोपे मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसादही उत्तम असतो. त्यामुळे बागायत रोपबाजार पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे.
पर्यावरणप्रेमींनी साधली पर्वणी- महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)
दोन दिवसात 43 हजार रोप आणि बियाणांची विक्री झाली आहे. विविध जातींची रोपे आणि शोभिवंत झाडे ठेवण्यात आली होती. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबरच मध, अळंबी, सेंद्रिय शेतीबाबतही माहिती देण्यात आली.









