5 लाखाचा महसूल जमा झाल्याची माहिती
बेळगाव : स्वातंत्र्यदिन जवळ येत असून सरकारी कार्यालयांसोबतच खासगी आस्थापने, इमारतींवर तिरंगा ध्वज फडकविला जातो. यासाठीच पोस्ट विभागाने मागील वर्षीपासून तिरंगा ध्वजाची विक्री सुरू केली होती. यावर्षी बेळगाव पोस्ट विभागाने 20 हजार ध्वजांची विक्री केली असून, यातून 5 लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. घरांवर ध्वज फडकविण्यासाठी पोस्ट कार्यालयाच्या सहयोगाने तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात आली. मागील वर्षी बेळगाव विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. तिरंगा ध्वज शेवटच्या काही दिवसात अपुरे पडले. यावर्षीही ध्वजविक्रीला सुरुवात करण्यात आली. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत तिरंगा ध्वज विक्री करण्यात येत आहे. 25 रुपयाला एक याप्रमाणे दर ठरविण्यात आला आहे. बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयासह विभागातील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये ध्वज विक्री सुरू आहे. आतापर्यंत 20 हजार ध्वजांची विक्री केल्याची माहिती पोस्ट विभागाने दिली आहे.
यंदाही पोस्ट विभागात तिरंग्याची विक्री : विजय नरसिंहा, पोस्ट अधीक्षक
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही बेळगाव पोस्ट विभागात तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत 20 हजारच्या ध्वजांची विक्री करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









