गतवर्षाच्या तुलनेत जलाशय भरून वाहण्यास 12 दिवसांचा विलंब, आता पर्यटकांची लागणार रीघ
प्रसाद तिळवे / सांगे
गोव्यातील सर्वांत मोठ्या, सांगेचे भूषण असलेल्या आणि निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱ्या सांगे येथील साळावली धरणाचा जलाशय बुधवार दि. 20 रोजी सकाळी 8.12 वा. भरून वाहू लागला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 12 दिवस उशिरा जलाशय भरला आहे. या घटनेमुळे पर्यटकांना भरलेला जलाशय पाहण्याचा आनंद लुटला येणार आहे.
केवळ सांगेवासीयच नव्हे, तर तमाम गोव्यातील लोक धरणाचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षी दि. 8 जुलै रोजी सकाळी 10.54 वा. जलाशय भरून वाहू लागला होता. मनावर भुरळ पाडणारे हे दृश्य पाहण्यासाठी साळावली धरणाकडे आता पर्यटकांची रीघ चालू होणार आहे. साळावली धरण पाण्याच्या बाबतीत दक्षिण गोव्याला जसे वरदान आहे तसेच पर्यटनदृष्ट्या गोव्याची शान वाढवते. त्यातच धरणाच्या पायथ्याशी असलेले बोटॅनिकल गार्डन येथील सैंदर्यात अधिक भर घालते. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत बारा दिवस उशिरा जलाशय भरला. जलाशयातील पाण्याची पातळी 41.15 मीटर्सपर्यंत पोहोचली की, तो ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागतो. यंदा पाऊस लांबल्याने धरणात दि. 22 जूनपर्यंत 29.10 मीटर्स (आरएल) अशी पाण्याची पातळी होती.
मंगळवारपर्यंत 71.8 इंच म्हणजे 2170.2 मिलिमीटर इतका पाऊस पडलेला आहे. गेल्या वर्षी 1599 मिलिमीटर इतका पाऊस पडल्यावर जलाशय भरला होता. साळवली धरण जलाशय ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागला की, येथील वर्षा पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त होते. येथील वातावरण भेट देणाऱ्या माणसाला प्रसन्न करून सोडते. त्यामुळे देशी–विदेशी पर्यटक धरणाला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. अजून तीन–चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यास जलाशय आणखी तुडुंब भरून कोसळणार आहे.
पर्यटकांसाठी पर्वणी
पावसाळ्यात येथील आनंद निराळाच असतो. पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच असते. जुलै महिना लागल्यावर जलाशय तुडुंब भरून वाहू लागण्याची घटना घडते. उंचावरून पडणारे पाणी अंगावर शहारे आणते. धरणाच्या जलाशयात 236.800 दशलक्ष घन मीटर पाणी साठविण्याची क्षमता असून जलाशयाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग 60 घन मीटर प्रति सेकंद इतका असते. या धरणाचा मूळ आराखडा बदलून पुढे ‘डकबेल स्पिलवे’ धर्तीचा आराखडा तयार करण्यात आला होता. धरणाची लांबी 1004 मीटर्स इतकी आहे. ‘यू’ आकाराची रचना असलेले हे धरण माती वापरून बांधण्यात आले असून जलाशय 24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेला आहे.
या धरणापासून काही अंतरावर शेळपे येथे अत्यंत जुने आणि मूळ कुर्डी येथून जशास तसे स्थलांतरित केलेले श्री महादेवाचे मंदिर असून त्याला येथे येणारे लोक आवर्जुन भेटी देतात. धरणावर वाहने घेऊन जाण्यास बंदी आहे. सध्या धरण पाहण्यास प्रवेश खुला आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच विकएंडला अक्षरश: गर्दी होते. धरणाच्या दोन्ही बाजूंनी आपली वाहने पार्क करून पायी चालत जाऊन धरण पाहावे लागते.
पाऊस उशिरा आल्याने जलाशय भरण्यास विलंब
यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने आणि धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी घटल्याने जलाशय ‘ओव्हरफ्लो’ होण्यास विलंब झाला. पण एखादी रेल्वेगाडी उशिरा आली, तरी गती वाढवून शेवटी वेळेवर प्रवाशांना पोहोचविते तसेच जणू निसर्गाने केले. उशिरा सुरू होऊन देखील चांगला पाऊस पडल्याने धरणाचा जलाशय भरला आहे आणि आता ‘ओव्हरफ्लो’ होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंते सिडनी फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी खात्याच्या तांत्रिक साहाय्यक अंजिता दिवकर आणि अभियंते स्वप्नील दिवकर हजर होते. पर्यटकांसाठी धरण खुले असून सर्वांनी स्वत:ची काळजी घेऊन आणि सुरक्षेकडे लक्ष देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटावा, असे आवाहन फर्नांडिस यांनी केले.
धरणावर 15 ऑगस्टपासून होणार रोषणाई
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत देशातील 75 धरणांची निवड करण्यात आली असून यामध्ये साळावली धरणाचा समावेश आहे. त्याअंतर्गत यंदाही 15 ऑगस्टला साळावली धरणावर रोषणाई करण्यात येणार असून ती 31 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. तसेच 14 ऑगस्टला सांगे बाजारात पदयात्रा, विद्यार्थ्यांसाठी रंगकाम स्पर्धा आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती सिडनी फर्नांडिस यांनी दिली.
सुरक्षारक्षक वाढविणार : फर्नांडिस
सध्या धरणाचा जलाशय भरून वाहू लागल्याने दिवसा सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार असल्याचे फर्नांडिस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर सांगितले. स्वप्नील दिवकर यांनी पर्यटकांनी आपल्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच धरणावरील सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. धरण परिसरात प्लास्टिक कचरा टाकू नये व स्वच्छता राखावी, असेही ते म्हणाले. पर्यटकांनी येथे येताना आपल्याबरोबर ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. मुख्य फटकातून आंत प्रवेश घेतला की, वन विकास महामंडळ पर्यटकाकडून प्रौढासाठी रु. 60 आणि मुलांसाठी रु. 30 याप्रमाणे प्रवेश फी आकारते. बोटॅनिकल गार्डनमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत प्रवेश दिला जातो.









