भारताचे जुन्या काळातील अष्टपैलू क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे 88 व्या वषी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 1960 ते 1973 या 13 वर्षात भारतासाठी अवघे 29 कसोटी सामने खेळलेल्या आणि 170 प्रथम श्रेणी सामन्यात 8545 धावा आणि 484 बळी घेतलेल्या सलीम दुराणी यांचा प्रभाव भारतीय क्रिकेटवर इतका कसा टिकून आहे? असा प्रश्न या पिढीला पडणे स्वाभाविकच. पण एखादा खेळाडू खेळला किती यापेक्षा खेळला कसा? याला ज्या काळात महत्त्व होते, रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीचीही रसिकांना किंमत होती आणि जगभरात मूठभरच देश क्रिकेट खेळत असताना आपली नाममुद्रा उमटवण्यासाठी जे काही भारतीय आपल्या शैलीने प्रयत्न करत होते, त्यात दुराणी होते. त्यांना जाणायचे तर जागतिक दर्जाच्या महान क्रिकेटपटूंनी या खेळाडूबद्दल काय लिहून ठेवले आहे ते वाचले पाहिजे. सनी डेज या आपल्या आत्मचरित्रात सुनील गावस्कर यांनी अनपेक्षितरित्या दुराणी यांना अंकल म्हणण्यास का सुरुवात केली याचा खूप उद्बोधक किस्सा वाचायला मिळतो. 1971 मध्ये प्रसिद्ध वेस्टइंडीजच्या दौऱयापूर्वी श्रीलंकेबरोबर भारताला गुंटूर येथे खेळायचे होते. परतीचा प्रवास गुंटूर ते मद्रास असा रेल्वेने करायचा होता आणि थंडीच्या दिवसात रेल्वेत पांघरूण उपलब्ध नव्हते. त्या काळात रणजीपटू असणाऱया गावस्कर यांना कुडकुडताना पाहून दुराणी यांनी रेल्वे कर्मचाऱयांची ओळख काढून एक पांघरूण मिळवले. ते गावस्करना दिले. पहाटे गावस्कर यांना जाग आली तेव्हा दुराणींसारखा प्रसिद्ध क्रिकेटर एका नवख्यासाठी पाय दुमडून बर्थवर झोपल्याचे आढळले! तर या अंकलनी 1971 च्या वेस्टइंडीज वरील भारताच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या मालिकेचे खरे नायक गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांना मानले जाते. मात्र खुद्द गावस्कर यांनी श्रेयात दुरानी यांना वाटेकरी बनवले आहे. पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्यात सलग दोन चेंडूवर क्लाईव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांना त्यांनी पॅवेलियनचा रस्ता दाखवला. गतीने फिरकी गोलंदाजी करण्यात प्रसिद्ध दुराणी यांनी अजित वाडेकरना चेंडू आपल्याकडे सोपवण्याची मागणी केली. त्यांनी ती मानली. पुढच्या चेंडूवर लॉईड यांनी फटका लगावला. मात्र तो अजित वाडेकर यांनी झेलला. सलगच्या चेंडूवर त्यांनी सोबर्सना बोल्ड केले. या अद्वितीय कामगिरीनंतर दुराणी स्वतःवरच इतके खूश झाले की पुढचा मिनिटभर ते उडय़ाच मारत राहिले. गावस्कर यांनी त्यांना थांबवत, अंकल, अजून असेच स्कीपिंग करत राहणार आहात की मॅच पण पुढे न्यायची आहे? असा प्रश्न केला! दुराणी यांना सोबर्स यांनी महान क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे. तो काळ डोळय़ासमोर आणण्यासारखाच! एक तर साठच्या दशकात भारतात असे सामने टेलिव्हिजनवर पाहण्याची सोय नव्हती. रेडिओवरून होणारे धावते समालोचन क्रिकेट रसिकांच्या डोळय़ासमोर अक्षरशः मैदानाचे चित्र उभे करायचे. त्या काळातील गाजलेल्या क्रिकेटपटूंचे छायाचित्र तेवढे प्रेक्षकांनी कधीतरी पाहिलेले असायचे. त्याच्या जोरावर त्याचा चेहरा, त्याची उभे राहण्याची आणि खेळण्याची लकब जाणून समालोचक ज्या पद्धतीने वर्णन करतो त्या पद्धतीने सामना दृश्य स्वरूपात नजरेसमोर आणत प्रेक्षक प्रत्यक्षदर्शीसारखे रमून जात. समालोचकाच्या शब्दात खेळाडूची खेळी कानाद्वारे रसिकांच्या मनात उतरून वर्षानुवर्षे हृदयात स्थान राखून राही! जवळपास तीन, चार पिढय़ांनी असे क्रिकेट जगले. त्यांच्या वाणीतून ते पुन्हा पुन्हा जिवंत होत पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचले. त्यामुळेच सलीम दुराणींसारख्यांची खेळी पुढच्या पिढीच्या मनातही वाहती राहिली. आज खेळणाऱया देशांची वाढलेली प्रचंड संख्या, खेळाला आलेले ग्लॅमर, कसोटी, एकदिवसीय सामान्यांना मागे टाकत आयपीएल आणि ट्वेंटी-ट्वेंटी सारख्या गतिमान खेळाचा हा काळ आहे. आता रणजी, दुलीप करंडक वगैरे लोक विसरून गेले आहेत. भारतासाठी कुठल्या मैदानावर कोणता खेळाडू तयार होतो आहे याची माहिती लोकांना कधीही मिळत नाही. अचानक एखादा खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा भाग होतो किंवा आयपीएलमध्ये चमकतो आणि मग तो जगाला माहीत होतो. शंभर सामने खेळण्याचा मान त्या काळात एखाद्या गावस्करला लाभायचा. बाकीच्यांची खेळी मर्यादित मात्र कीर्ती अमर्याद पसरायची. कारण ते जंटलमन्स क्रिकेट होते. जगातील खेळाडूंमध्ये इर्षा आणि स्पर्धा होती. मात्र असूया नव्हती. आज जग जवळ आले, देशोदेशीचे खेळाडू एकमेकांसोबत खेळू लागले. पण, स्वकीय असो की परकीय खेळाडूंमध्ये जे अंतर पडले आहे ते उघडय़ा डोळय़ांनी सहज दिसणारे आहे. धावांचा डोंगर रचणारे कधी स्मृती पटलाआड निघून जातात हे लक्षातही राहत नाही. त्यांच्या जागी नवे विक्रमवीर येतात, बघता बघता विस्मृतीत जातात! अशा काळात अवघी तेरा वर्षे क्रिकेट खेळलेला एक क्रिकेटपटू 88 व्या वषी या जगाचा निरोप घेतो आणि तरीसुद्धा क्रिकेट विश्व हळहळते. हे आजच्या काळाच्या दृष्टीने तर अद्भुतच! आजच्या पिढीला नायक सुद्धा चार-पाच सिनेमांनंतर नकोसा होतो. अशा काळात क्रिकेटमधील एखाद्या जुन्या खेळाडूप्रती प्रेक्षकांची असणारी निष्ठा, प्रेम आणि खेळाविषयीचा आदर दर्शवणाराच. खेळ म्हणजे बेटिंगचे साधन नव्हे तर उत्तम कलेची उपासना आहे असे मानणाऱयांच्या काळाचे सलीम दुराणी नायक होते. त्यांचे कौतुक करताना द्वारकानाथ संझगिरी म्हणतात, सलीम डावखुरे. त्यामुळे खेळताना दिसायचे अत्यंत शैलीदार. त्यात त्यांची सुंदर उंच बॅकलिफ्ट, मस्त फॉलो थ्रु यामुळे त्यांच्या बॅटमधून फटका हा खळाळणाऱया झऱया सारखा वाहत जायचा आणि वाहणारा फटका गवताला गुदगुल्या करायचा. त्यांची फलंदाजी पाहणं हा फलंदाजांची आर्ट गॅलरी पाहण्यासारखा अनुभव होता! प्रेक्षकांनी गॅलरीतून हाक द्यावी आणि दुराणी यांनी तिथेच नेमका सिक्सर मारावा! हा रसिक आणि खेळाडूंतील संवाद थांबू नये. हीच त्यांना मानवंदना ठरावी.
Previous Articleनाविन्यपूर्ण कृषी प्रणालीतील शोध
Next Article 106 वर्षीय टूटू आर्टिस्टचा गौरव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








