राज्य शासनातर्फे ठेवण्यात आली होती स्पर्धा
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्य शासन आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सावंतवाडीतील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असुन हे मंडळ आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. या मंडळाचे यावर्षीचे ११८ वे वर्ष असून दरवर्षी या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूकही खास आकर्षण असते. यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारत गड किल्ले संवर्धनाचा संदेश या मंडळाने दिला होता. राज्य शासन आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सालईवाडा गणेशोत्सव मंडळाचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









