दापोली :
तालुक्यातील साकुर्डे येथील गरीब कुटुंबात वाढलेल्या अन् जन्मापासून दिव्यांग असलेल्या सुरेश जोशी याने लहानपणापासून क्रिकेटची आवड जोपासली. त्यासाठी कोणापुढे हात पसरले नाहीत. जिद्दीच्या जोरावर त्याने राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावरील मैदाने गाजवत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. त्याची व्हीलचेअर इंडो-नेपाळ क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
दापोली तालुक्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान त्याने पटकावला आहे. जोशी हा ‘तरुण भारत संवाद’साठी दापोली तालुक्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळवी विभागात वार्ताहर म्हणूनही काम करत आहे.

इंडो-नेपाळ टी-२० मालिकेचे तीन सामने रुद्रपूर-उत्तराखंड येथे होणार आहेत. हे सामने २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार असल्याची घोषणा दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाने केली आहे. जोशी याने राज्यस्तरावर २००८ ते २०१६ मध्ये झालेल्या स्पर्धेत कर्णधार म्हणून कल्याण व रत्नागिरी जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र ब्लू रेडच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवून संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिले. व्हीलचेअर क्रिकेटच्या महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर त्याला ‘बेस्ट विकेटकिपर’ म्हणूनही सन्मानित केले.








