वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेत रविवारी महिलांच्या 54 किलो वजन गटात भारताच्या 24 वर्षीय साक्षीने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे.
महिलांच्या 54 किलो वजन गटातील अंतिम लढतीत साक्षीने अमेरिकेच्या योसलिने पेरेजचा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेमध्ये आता भारताची 11 पदके निश्चित झाली आहेत. विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या ब्राझीलमधील पहिल्या टप्प्यात भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 6 पदकांची कमाई केली होती.
महिलांच्या 48 किलो वजन गटात भारताच्या मिनाक्षीने कझाकस्तानच्या नेझिम केझाबेचा 3-2 अशा गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या 85 किलो गटात जुगनूने तसेच महिलांच्या 80 किलो वजन गटात भारताच्या पुजा राणीने रौप्यपदके पटकाविली आहेत. या स्पर्धेत भारताच्या आणि चार स्पर्धकांनी विविध वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.









