वृत्तसंस्था/ भोपाळ
स्थानिक नेमबाज आशी चौक्सीने ऑलिम्पियन्स अंजुम मोदगिल व श्रीयांका सदनगी यासारख्या बलाढ्या नेमबाजांना मागे टाकत 67 राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये 50 मी. रायफल 3 पोझिशन्स प्रकारात पहिले राष्ट्रीय जेतेपद पटकावले.
आशीने 466.7 गुण घेत जवळची प्रतिस्पर्धी अंजुम मोदगिलपेक्षा 3.1 गुण जास्त घेत सुवर्ण पटकावले. महाराष्ट्राची उदयोन्मुख नेमबाजी साक्षी सुनील पेडेकरने 451.3 गुण घेत कांस्यपदक मिळविले. यानंतर आशीने कनिष्ठ महिला 3 पी प्रकारात रौप्यपदक पटकावले. गेल्या दोन वर्षापासून आशी जबरदस्त फॉर्ममध्ये असून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने भाग घेतला होता. पात्रता फेरीत तिने 590 गुणही नोंदवले होते. महाराष्ट्राच्या भक्ती भास्कर खामकरने 592 गुण घेत या फेरीत अव्वल स्थान मिळविले हेते तर अंजुमने 590 गुण घेत दुसरे स्थान मिळविले होता. साक्षी सहाव्या तर श्रीयांना सातव्या स्थानावर राहिली.
अंतिम फेरीत मात्र आशीने नीलिंग पोझिशननंतर अंजुमवर 2.3 गुणांची आघाडी घेतली, प्रोन पोझिशनमध्येही तिने ही आघाडी कायम राखली तर शेवटच्या 10 शॉट्सच्या स्टँडिंग पोझिशनमध्ये तिने ही आघाडी 2.9 गुणांची करीत जेतेपदही निश्चित केले.
कनिष्ठांच्या 3 पी नेमबाजीत कर्नाटकच्या अनुष्का एच ठाकोरने 460.5 गुण घेत साक्षीला मागे टाकले. साक्षीने 456.3 गुण घेत रौप्य तर हरियाणाच्या निश्चलने 443.9 गुण घेत कांस्य पटकावले. अंजुम व साक्षी यांनी वरिष्ठ गटात महिलांच्या 3 पी प्रकारात व कनिष्ठांच्या सांघिक विभागात सुवर्णपदके मिळविली. अंजुम, सिफ्ट कौर सामरा, वंशिका साही यांनी 1766 गुण घेत पंजाबसाठी सांघिक सुवर्ण मिळविले तर साक्षीने प्राची गायकवाड सानिया सप्ले यांच्या 1747 गुण घेत कनिष्ठ गटाचे सांघिक सुवर्ण मिळविले.









