सांखळी : सांखळी नगरपालिका निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता जाहीर झाली असल्याने सांखळीत राजकारण वेगवान झालेले आहे. रविवारी रात्री भाजप व काँग्रेस समर्थक टुगेदर फॉर सांखळी या गटांच्या विविध ठिकाणी बैठका सुरू होत्या. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.तसेच दोन्ही गटांचे सर्व उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. लवकरच ते जाहिरही होणार आणि अर्ज सादर.करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रक्रियेचा काळ कमी ठेवल्याने सर्वांचीच धावपळ उडाली असल्याचे निदर्शनास येते. सांखळी नगरपालिकेत प्रमुख असलेल्या भाजप गट आणि टुगेदर फॉर साखळी यांच्यात ही निवडणूक रंगणार शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी दोन्ही गट व या गटातील नेते कामाला लागले आहेत. सांखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप गटाची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत विद्यमान नगरसेवक, संभाव्य उमेदवार व भाजपच्या नेत्यांची उपस्थिती होती. बहुतेक सर्व उमेदवार भाजप गटातर्फे निश्चित झालेले आहेत. तरीही काही प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्यांच्यामध्ये समेट घडवून सामंजस्याने ही निवडणूक लढविण्यासाठी व जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याचे समजते.
सर्व प्रभागांमधील लोकांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत. या उमेदवारांना सर्वांची मान्यता असून सर्वांना निवडून आणण्यासाठी सांखळी मतदारसंघ व नगरपालिका क्षेत्रातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहेत. यावेळी सांखळीत निश्चितपणे भाजपचीच सत्ता स्थापन होणार आहे. उमेदवारांची यादी लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील, असे मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी या विषयावर बोलताना सांगितले. साखळीत गेली पाच वर्षे लोकांच्या समवेत राहून सत्ताधारी गटाने केलेली कामे लोकांच्या नजरेसमोर आहेत. कोवीडकाळात लोकांच्या सेवेसाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केलेले सेवाकार्य लोकांच्या समोर आहे. त्यामुळे या निवडणुकीतही सांखळी नगरपालिकेवर टुगेदर फॉर साखळी गटाचेच वर्चस्व स्थापन होणार, असा विश्वास या गटाचे नेते प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केला. या गटाची महत्वपूर्ण बैठक साखळीत सुरू होती. आम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवताना निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची तयारीही चालू ठेवली आहे. टुगेदर फॉर साखळी या पॅनलचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. लवकरच ते जाहिरही करून व अर्जही सादर करण्याची तयारी सुरू करणार आहोत, असेही प्रवीण ब्लेगन यांनी या विषयावर बोलताना सांगितले .









