भाग्यश्री, निमरत अन् राधिका मदानचा चित्रपट

अभिनेत्री भाग्यश्रीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘सजनी शिंदे का वायरल वीडियो’ 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार भूमिकेसह परतणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे हा उत्तम अभिनेता असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तसेच राधिका मदान आणि निमरत कौर देखील यात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत अनोखा आहे. ट्रेलरमध्ये सजनी शिंदे उर्फ अभिनेत्री राधिका मदान कशी आणि का गायब झाली? तिच्या गायब होण्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे दिसून येते. या चित्रपटाची कहाणी एका भौतिकशास्त्राच्या शिक्षिकेच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. ही शिक्षिका रहस्यमय स्थितीत गायब होते. या शिक्षिकेचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी बेला (निमरत कौर) यांना प्राप्त होते.
हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चालू वर्षातील सर्वात थ्रिलर चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसून येणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात राधिका, निमरत अन् भाग्यश्री यांच्यासोबत सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास हे कलाकारही झळकणार आहेत.









