काँग्रेस नेत्याला मोठा दिलासा : 3 जणांची हत्या केल्याचा होता आरोप : अन्य एका प्रकरणी जन्मठेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये 3 जणांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. सुल्तानपुरीमध्ये दंगलीदरम्यान 3 जणांची हत्या करण्यात आली होती. सुल्तानपुरीतील दंगलीवेळी सज्जन कुमार हे जमावाला चिथावणी देत होते असा आरोप साक्षीदार चाम कौर यांनी केला होता.
जुलै 2010 मध्ये कडकडडूमा न्यायालयाने सज्जन कुमार, ब्रह्मानंद पेरु, कुशल सिंह आणि वेद प्रकाश यांच्या विरोधात 3 जणांच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चित केले होते. आता सुमारे 13 वर्षांनी सज्जन कुमार समवेत अन्य आरोपींची याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर दिल्लीत 5 शिखांची हत्या करत गुरुद्वारा पेटवून देण्यात आला होता. याच प्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावण्यात आली होती.
शीखविरोधी दंगल 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भडकली होती. इंदिरा गांधी यांच्या सरकारने खलिस्तानी दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यूस्टार राबविले होते. यात दहशतवादी भिंद्रनवाले समवेत अनेक जणांचा मृत्यू झाला होता. सुवर्ण मंदिर परिसरात ही मोहीम पार पडल्याने शीखधर्मीय नाराज झाले होते. यानंतर काही दिवसांनीच इंदिरा गांधी यांच्या शिख सुरक्षारक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर देशभरात शीखविरोधी दंगली सुरू झाल्या होत्या. या दंगलीचा सर्वाधिक प्रभाव दिल्लीत दिसून आला होता. दंगलीदरम्यान सुमारे 3 हजार लोकांना जीव गमवावा लागला होता.









