के. आर. शेट्टी क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी किंग्ज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराज अ, हर्ष इलेव्हन यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला. आकाश असलकर, अजय बडगेर, समीर यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावरती आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात साईराज अ ने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 78 धावा केल्या. त्यात संतोष जाधवने 3 चौकारांसह 25 तर वसंत शहापूरकरने 2 षटकार 1 चौकारांसह 21 धावा केल्या.
अयोध्या कडोलीतर्फे ऋतिकने 3 तर तुषारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अयोध्या स्पोर्ट्स कडोलीने 8 षटकात 9 गडी बाद 44 धावा केल्या. त्यात अजयने 32 तर साहीलने 10 धावा केल्या. साईराजतर्फे आकाश असलकरने 10 धावांत 3 तर करणने 6 धावांत 2 गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात हर्ष इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 114 धावा केल्या. त्यात अजयने 6 चौकारांसह 36 तर साकीबने 3 षटकार 2 चौकारांसह 35 धावा केल्या. एचएमडी फौंडेशनतर्फे फिरोजने 22 धावांत 3 तर नईमने 15 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एचएमडी संघाचा डाव 78 धावांत आटोपला. त्यात नबीलने 17, फिरोजने 15 धावा केल्या. हर्षतर्फे अजय व मिथुन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात शितल रामशेट्टी संघाने 10 षटकात सर्व गडी बाद 85 धावा केल्या. त्यात विशालने 1 षटकार 4 चौकारांसह 29 तर प्रवीणने 17 धावा केल्या. साईराजतर्फे समीरने 14 धावांत 4, कल्पेशने 9 धावांत 2 तर करणने 15 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराजने 9 षटकात 5 गडी बाद 89 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात रामनाथने 3 षटकार 1 चौकारासह नाबाद 25, श्रीशैलने 20, राहुलने 16 धावा केल्या.
शितल रामशेट्टीतर्फे विशालने 24 धावांत 2 तर आर्यनने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार देण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, मल्लेश चौगुले, अभिनेता पवन शेट्टी, प्रणय शेट्टी, सचिन कुडची, उत्तम शिंदे, शिवकुमार पद्मन्नावर व अशोक शेट्टी, गोपी शेट्टी, विजय शेट्टी, चंद्रकांत शेट्टी, सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शनिवारी अंतिम सामना दुपारी खेळविण्यात येणार असून बक्षीस वितरण प्रसंगी महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, विठ्ठल हेगडे, राहुल जारकीहोळी, सर्वोत्तम जारकीहोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारचे सामने
- मराठा स्पोर्ट्स वि. हर्ष इलेव्हन सकाळी 9 वाजता
- एसआरएस हिंदुस्थान वि. साईराज बी. सकाळी 11 वाजता
- अवनी स्पोर्ट्स वि. पहिल्या सामन्यातील विजेता दुपारी 1 वाजता
- साई स्पोर्ट्स वडगाव वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 3 वाजता









