पुढील फेरीत प्रवेश : साईराज चषक निमंत्रितांची फुटबॉल स्पर्धा : इन्फनिटी बेळगाव टायब्रेकरवर विजयी
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जगजंपी बजाजने खानापूर युनायटेडचा बुफा राहुल के. आर. शेट्टीने, जगजंपी बजाजचा साईराजने ब्रदर्सचा तर इन्फीनेटी बेळगावने रेघ एफसीचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 11 व्या निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात जगजंपी बजाज संघाने खानापूर युनायटेड संघाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला जगजंपी बजाजच्या नवीनच्या पासवर आदर्श गणेशने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाने गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या सामन्यात बुफा राहुल के. आर. शेट्टी संघाने जगजंपी बजाज संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 8 व्या मिनिटाला नजिब इनामदारच्या पासवर वसी घीवालेने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 34 व्या मिनिटाला अमिल बेपारीच्या पासवर अभिषेक चेरेकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 38 व्या मिनिटाला वसी घीवालेच्या पासवर निजब इनामदारने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सामन्यात साईराज संघाने ब्रदर्स एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. 44 व्या मिनिटाला साईराजच्या प्रज्वलच्या पासवर मोहित उगाडेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळविली. ब्रदर्सतर्फे गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. चौथ्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड संघाने मजर युनायटेडचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटात मोहित फयाजच्या पासवर मिथिलने पहिला गोल केला. 15 व्या मिनिटाला निदीम मकानदारच्या पासवर मोहित फयाजने दुसरा गोल करीत 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला मिथिलच्या पासवर नदीम मकानदारने गोल करून 3-0 ची आघाडी फास्ट फॉरवर्डला मिळवून दिली. या सामन्यात मजर युनायटेडला गोल करण्यात अपयश आले. पाचव्या सामन्यात इन्फीनेटी बेळगाव सिटी संघाने रेघ एफसी संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. या सामन्यात दोन्ही सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये इन्फनिटी बेळगाव संघाने 5-4 असा गोलफरकाने पराभव केला. इन्फनिटीतर्फे अतिफ मुजावर, प्रणित चिगरे, अजय कदम, कौशिक पाटील, धनंजय सुळगेकर यांनी गोल केले. तर रेघ एफसीतर्फे शाहीद मुजावर, मयुर पालेकर, अंश चोंचे, नवील शेखसाब यांनी गोल केले. तर जिशान कित्तूरने चेंडू बाहेर मारला.









