रुक्मिणीचे म्हणणे पांडुरंगाला पटले. त्यांनी तात्काळ आपले वाहन गरुडाला बोलावून सांगितले की देहूला जाऊन तुकारामांना तुझ्या खांद्यावर बसवून येथे आम्हाला भेटावयास घेऊन ये. पांडुरंगाची ही आज्ञा ऐकून गरुडाने नतमस्तक होऊन प्रणाम केला व आपले दिव्य पंख फडकावत एका क्षणार्धात देहू येथे तुकारामांसमोर उपस्थित झाला. गरुडाने पाहिले की तुकाराम गावाबाहेरच उभे आहेत. सर्व भक्त मंडळी पंढरपूरला गेल्यापासून जिथे त्यांना निरोप दिला त्याच ठिकाणी तुकाराम पंढरपूरच्या दिशेने आपले डोळे लावून त्यांची वाट पाहत उभे होते. आकाशातून उतरून गरुडाने तुकारामांना पांडुरंगाचा निरोप दिला. गरुड म्हणाला “तुझ्या वियोगाने पांडुरंग फार व्याकुळ झाले आहेत. तुझ्या शरीरामध्ये पंढरपूरपर्यंत येण्याची शक्ती नाही, म्हणून तुला आणण्यासाठी मला पाठविले आहे.” असे म्हणून तुकारामांना पांडुरंगांनी पाठविलेले पत्र दिले.तुकारामांनी ते पत्र आदरपूर्वक वाचण्यास सुरवात केली. पांडुरंगानी लिहिले होते ‘माझ्या भेटीला तू येऊ शकला नाहीस म्हणून तुला वियोग वाटतो आहे. पण समजून घे, माझीही अवस्था तशीच झाली आहे. म्हणूनच तुला आणावयास मी गरुडाला पाठविले आहे. त्याच्या पाठीवर बसून पवित्र क्षेत्र पंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी त्वरित ये. मलाही त्यामुळे आनंद होईल. नाही म्हणू नकोस, मी तुझी वाट पाहत आहे.’पांडुरंगाचे असे भावपूर्ण पत्र वाचून तुकारामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गरुडाला ते म्हणाले “असे अनुचित वर्तन मी कसे करू? आपण माझ्या स्वामींचे वाहन आहात. मी केवळ त्यांच्या पादुकांचा वाहक आहे. पायातले अलंकार सोन्याचे असले तरी कोणी डोक्यावर घालत नाही. माझा हा संभ्रम पांडुरंगाला सांगा.” असे म्हणत तुकारामांनी गरुडाच्या चरणांवर मस्तक ठेवले. तुकारामांची ही प्रामाणिक इच्छा ऐकून गरुड परत पांडुरंगाकडे आला. नमस्कार करत पांडुरंगांना म्हणाला “तुकाराम माझ्या पाठीवर बसावयास तयार नाही, पण आपली वाट पाहत देहू गावाबाहेरच उभा आहे.” हे ऐकून पांडुरंग भावविवश झाले व रुक्मिणीला म्हणाले “आता आपल्याला तुकारामाला भेटावयास देहूला गेलेच पाहिजे”
इकडे पंढरपुरात आषाढ एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सर्व वैष्णव भक्त गोपाळपूरा येथे आले. तेथे गोपाळकाल्याचा कार्यक्रम झाला. सर्वजण भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेचे वर्णन करण्यात व ऐकण्यात मग्न होते. भक्तिरसात न्हाऊन जात हरिनाम संकीर्तन करत वैष्णव तल्लीन होऊन डुलत होते. असा दिव्य महोत्सव साजरा केल्यानंतर सर्व यात्रेकरू आपापल्या गावी प्रवासास निघाले. भक्तांनी पंढरपूर सोडताना भगवंताकडे कळकळीची प्रार्थना केली. ते म्हणाले “देवाधिदेवा रुक्मिणिवरा, कृपा करून तुकारामांना भेटण्यास जावे” अशी तुकारामांसाठी प्रेमाने प्रार्थना केल्यावर सर्व वैष्णव आपापल्या मार्गाला लागले. रस्त्याने हरिनाम संकीर्तन करीत, पंढरपूरची आठवण करत करत, पुन्हा देहू गावाजवळ वैष्णव मंडळी परत आली. देहू गावाजवळ परत आल्यावर त्यांनी पहिले की, तुकारामांनी ज्या ठिकाणी निरोप दिला होता त्याच ठिकाणी ते पंढरपूरला गेलेल्या भक्तांची परत येण्याची वाट पाहात विरहभावनेत उभे आहेत. तुकारामांचे डोळे पंढरपूरकडे लागले होते. सर्व भक्तांनी त्यावेळी ज्या अवस्थेत तुकारामांना पाहिले आणि आश्चर्यचकीत होऊन म्हणाले “एवढी भक्ती करण्याचा निर्धार कोणाकडे आहे?”. शिवाजी महाराजांनी, तुकारामांच्या चरणाशी लोटांगण घालत भेट म्हणून सुवर्ण मोहरा, रेशमी वस्त्रs, अलंकार, एवढेच नव्हे तर एक गावही बहाल केले, पण तुकारामांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांचे अंत:करण पूर्णपणे भौतिक इच्छांपासून मुक्त झाले आहे. तुकारामांच्या केवळ दृष्टीपाताने लोखंडाचे सोने झाले पण त्यांच्या पत्नीच्या गळ्याभोवती एक फुटका मणीही नाही. कारण सोने त्यांना माती समान वाटते. तुकारामांच्या आजूबाजूला अष्टसिद्धी घुटमळत असतात परंतु त्यांच्या घरामध्ये एक वेळ पुरण्याएवढे धान्यही नाही. असा वैष्णव कोठे आहे का? सर्वानी तुकारामांना पाहून साष्टांग दंडवत केला, त्यामध्ये रामेश्वरभट्टही होते. ते स्वत:ला आता तुकारामांचे शिष्य समजत होते. त्याने दंडवत केल्यावर मी ह्यांचा गुरु आहे, असा अहंभाव न ठेवता तुकारामांनीही त्यांना दंडवत करून प्रेमाने आलिंगन दिले. तुकाराम स्वत:ला कधीच गुरु समजत नसत. सर्व जीव भगवंताचे अंश आहेत व आपण त्यांचे सेवक आहोत हीच त्यांची नम्र भावना होती व अशा प्रेममयी भक्तीमुळेच तुकारामांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे केले होते. सर्व वैष्णवांनी तुकारामांची भेट घेऊन एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. पंढरपूरहून आणलेला विठ्ठलाचा प्रसाद त्यांनी तुकारामांना दिला, त्यांनी तो आनंदाने स्वीकारत सेवन केला आणि म्हणाले “माझे पांडुरंग कसे आहेत? ठीक आहेत ना?” हे म्हणत असताना त्यांना पांडुरंगाचा विरह भासू लागला, आणि त्या भावनेत ते म्हणाले “मला त्यांनी इथे दूर सोडून दिले आहे.”
त्यानंतर सर्व वैष्णवांनी तुकारामांना, पंढरपूर महोत्सव कसा साजरा झाला त्याचा सविस्तर वृत्तांत दिला व म्हणाले “पंढरीनाथ, आज तुमच्या भेटीसाठी येत आहेत” तुकारामांना ही वार्ता ऐकून अत्यानंद झाला व उत्कंठतेने ते म्हणाले “भेटीची आर्त बहुत पोटी । म्हणे चला जगजेठी सत्वर” असे म्हणत निश्चयाने पांडुरंगाची करुणा भाकत त्यांची वाट पाहत तुकाराम पंढरपूरकडे डोळे लावून तेथेच उभे राहिले. तुकारामांचा भगवंताच्या भेटीचा हा निश्चय सर्व देहूकरांनी पाहिला आणि तुकाराम आपल्याबरोबर येणार नाहीत हे जाणून आपापल्या घरी निघून गेले. तुकारामांनी जेथून पांडुरंगाला पत्र पाठविले, त्याच जागेवर ते भगवंताची वाट पाहत उभे होते. तुकाराम वैकुंठनायकाचे चिंतन करीत तेथे उभे होते, तेवढ्यात गरुडाच्या पंखांचा फडत्कार ऐकू आला. भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गरुडाच्या पाठीवर बसून आकाशमार्गातून खाली जमिनीवर उतरले. त्यांच्या अंगावरील दिव्य पीतांबराच्या तेजासमोर सूर्याचे तेजही फिके पडत होते. त्यांचे शरीर फारच सुकुमार दिसत होते. त्यांनी दोन्ही हात आपल्या कटीवर ठेवले होते. कानामध्ये आकर्षक मकरकुंडले घातली होती. त्यांच्या मुखाकडे पाहून प्रसन्न वाटत होते. त्यांच्या गळ्यात कौस्तुभ मणी व गळ्याभोवती वैजयंतीमाळा शोभत होत्या. त्याचबरोबर तुळशीमाळ धारण करणारे भगवान भौतिक जगातील दु:खग्रस्त जीवांना केवळ त्यांच्या दर्शनाने शाश्वत शांती व सुख प्रदान करीत होते. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी सहित आता तुकारामासमोर साक्षात उभे होते. तुकाराम आपल्या ध्यानस्थ अवस्थेतून सावध झाले व त्यांनी पहिले की, आपल्यासमोर प्रत्यक्ष प्राणनाथ उभे आहेत. ताबडतोब त्यांनी पांडुरंगाचे चरण नतमस्तक होऊन पकडले. भगवंतांनी तुकारामांना जशी माता आपल्या ताह्या बाळाला हृदयाशी कवटाळते त्याप्रमाणे प्रेमाने आलिंगन दिले. तुकारामांचा आनंद गगनात मावेना. तुकारामांचे घर मोडकळीस आलेल्या अवस्थेत होते. छप्परसुद्धा नीट नव्हते. वारे चहू दिशांनी वाहात होते. वैकुंठनाथ तुकारामांना म्हणाले, मला खूप भूक लागली आहे, लवकर साहित्य जमा कर व स्वयंपाक करून वाढ. तुकारामांनी आपली पत्नी आवलीला सांगितले, देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी आले आहेत. शुद्ध अंत:करणाने स्वयंपाक करून त्यांना जेवावयास वाढ. मग आवलीने सत्वर कण्या दळून, भाकरी व भाजी तयार केली व तुकारामाने विठ्ठल रुक्मिणीला पाटावर बसवून ती भाजी भाकरी वाढली. जे भगवंत ऋषींनी अर्पण केलेली दुधा-तुपाची पंचपक्वान्नाची समिधा कधी कधी स्वीकार करत नाहीत, तेच भगवंत तुकारामांच्या घरी साधी भाजी-भाकरी आनंदाने सेवन करत होते. दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांसाठी आपल्या महालात पंचपक्वान्न बनविले, पण त्यांनी विदुराचे घरी कण्या खाण्यातच आनंद मानला. भगवंत भक्तीने आपल्या भक्तांच्या प्रेमात बांधले जातात. आणि म्हणूनच भगवंत तुकारामांची प्रामाणिक, निस्सीम, भक्ती पाहून त्यांच्या घरी साधी भाजी भाकरी खाऊन तृप्त झाले, त्यानंतर तुकारामांनी भगवंतांना मुखशुद्धीसाठी तुळशीचे पान दिले. अशी तुकारामांची प्रेमभक्ती स्वीकारून भगवंत प्रसन्न झाले व आनंदाने तुकारामांचा निरोप घेऊन निघाले.
-वृंदावनदास








