दरवषी देहूपासून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला संत तुकाराम महाराजांची पादुका घेऊन पालखी निघते. हा प्रसंग 400 वर्षांपूर्वीचा आहे जेव्हा संत तुकाराम महाराज देहूमध्ये प्रत्यक्ष वास्तव्य करीत होते. तुकारामांनी आषाढी-कार्तिकी वारी कधी चुकविली नाही. पण एकदा ते खूप आजारी असल्यामुळे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. त्यांना थंडी तापाचा त्रास होऊन खूप अशक्तपणा आला होता. एक पाऊल उचलण्याइतकीही शक्ती त्यांच्या अंगात नव्हती. तुकाराम दु:खी होऊन म्हणाले, ‘माझ्या पंढरपूर यात्रेसाठी फार मोठे विघ्न माझ्यासमोर उभे ठाकले आहे. काय उपाय करावा समजत नाही’ गायीला पाहून वासरू हंबरते, चंद्राविना चकोर पक्षाची तळमळ होते, चातक पक्षाला स्वाती नक्षत्राचे ढग दिसले नाहीत तर, त्याची तळमळ होते. त्याचप्रमाणे आपणाला पंढरपूरला जाता येणार नाही, याचे दु:ख त्यांच्या हृदयात होते. मासा जसा पाण्याविना तडफडतो, आईशिवाय लहान मूल जसे रडते किंवा एखाद्या कृपणाचे धन हरविल्यानंतर तो जसा मनाने दु:खी होतो, त्याप्रमाणे तुकारामांना पंढरपूरला जाता येत नसल्याची खंत होती आणि यासाठी त्यांचे अंत:करण झुरत होते.
तुकारामांच्या प्रचारामुळे अनेक लोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्र्रय घेतला होता व ते हरिनाम संकीर्तन करीत होते. ते सर्व वैष्णवभक्त आज दिंड्या -पताका घेऊन टाळ, मृदंगाच्या साथीने हरिनामाचा गजर करत आपल्याबरोबर तुकारामांनाही पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी देहू येथे आले. त्यांना पाहिल्यावर तुकारामही त्या वैष्णव भक्तांना भेटण्यासाठी घराबाहेर आले. आलेल्या हरिभक्तांना तुकारामांनी आपली शारीरिक स्थिती सांगितली आणि पंढरपूरला प्रत्यक्ष येण्याबद्दल असमर्थतता व्यक्त केली. त्यावषी तुकारामांनी त्या भक्तांबरोबर अभंग रूपात विठ्ठल-ऊक्मिणीसाठी पत्र लिहून पाठविले. पत्र लिहिताना त्यांचे डोळे अश्र्रूंनी भरून आले व कंठ सद्गदित झाला होता. तुकाराम आपल्या त्या अभंगात म्हणतात कोणा मुखे ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरीनाथ बोलवितो ।।1।। मग मी न धरी आस मागील बोभाट । वेगीं धरीन वाट माहेरची ।।2।। निरांजले चित्त कारिसे तळमळ । केधवां देखती मूळ आले डोळे ।।3।। तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ।।4।। अर्थात ‘चल पंढरीनाथ तुला बोलावीत आहेत, असे मला कोणाच्या मुखातून ऐकायला मिळेल काय? असे ऐकल्यावर मी मागची सर्व आशा सोडून, त्वरेने पंढरीची वाट धरीन, माझे चित्त तळमळ करीत आहे की, आता मला पंढरीहून बोलावणे आल्याचे कधी दृष्टीस पडेल? तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी पाहण्यासाठी माझे भाग्य कधी उदयास येईल.’ या अभंगातून तुकारामांना पांडुरंगाबद्दल किती विरह वाटतो आहे हे दिसून येते, त्याचप्रमाणे पंढरीची वारी करताना कसा भाव असावा याचेही वर्णन आहे.
कां माझा विसर पडिला मायबापा । सांडियेली कृपा कोण्या गुणे ।।1।। कैसा कंठूनीयां राहों संवसार। काय एक धीर देऊं मना ।।2।। नाही निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांही ।।3।। तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाही समाधान केले माझे ।।4।। अर्थात ‘मायबापा, पांडुरंगा, माझा विसर तुम्हाला का पडला? कोणत्या कारणास्तव माझ्यावर कृपादृष्टी करण्याचे सोडून दिले? आता या संसारात मी दिवस तरी कसे कंठू? मनाला काय म्हणून धीर देऊ? आपल्याकडून काही निरोप आला नाही, याची चिंता किती करावी? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, आपण एका शब्दानेदेखील माझे समाधान केले नाही.’ या अभंगात तुकाराम महाराज पांडुरंगाला प्रŽ विचारीत आहेत असे वाटते, पण भाव असा आहे की पंढरपूरला जाण्यासाठी पांडुरंगाची कृपा असावी लागते, केवळ आपली इच्छा असून उपयोग नाही. पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही होते आहे हा विश्वास असणे महत्त्वाचे आहे.
देवांच्याही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनी ।।1।। पातकांच्या रासी नासितोसी नामे । जळतील कर्मे महा दोष ।।2।। सर्व सुखें तुझ्या वोगळती पायी । रिद्धी सिद्धी ठायी मुक्तिचारी।।3।। इंद्रासी दुर्लभ पाविजे ते पद । गीत गाता छंद वाहता टाळी ।।4।। तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचे तू जीवन पांडुरंगा ।।5।। अर्थात ‘हे देवाधिदेवा, गोपिकांच्या पती, तुम्ही उदार अंत:करणाचे आहात, अशी आपली त्रिभुवनात ख्याती आहे. तुमचे नामस्मरण करणाऱ्यांच्या, पातकांच्या राशी तुम्ही नाहीशा करता. त्यांचे महादोष आणि दुष्कर्मेही जळून जातात. सर्व सुखे आपल्या चरणांच्या आश्र्रयाखाली आहेत. त्याचप्रमाणे चारीही मुक्ती अष्टसिद्धी यांना आपल्या चरणांचा आश्र्रय आहे. इंद्रालाही दुर्लभ असलेले आपले चरण केवळ हरिनाम गाण्याने, नाचत टाळी वाजवण्याने प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, जे जीव भौतिक बंधनात अडकून शक्तिहीन झाले आहेत त्यांचे पांडुरंग तू जीवन आहेस.’ या अभंगात भगवंतावर का विश्वास ठेवावा याची कारणे तुकाराम महाराज देत आहेत.
अशा आशयाचे 24 अभंगाचे पत्र तुकारामांनी, विठ्ठल-ऊक्मिणीसाठी लिहिले आणि पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या वैष्णव भक्तांकडे विठ्ठलाकडे देण्यासाठी दिले. त्यानंतर एकमेकांना दंडवत करून, प्रेमाने आलिंगन देऊन भगवंताच्या नामाचा गजर करीत वैष्णवजन पंढरीच्या दिशेने निघाले. पण तुकारामाच्या विरहामुळे त्यांची पावले लवकर उचलेनात. तुकारामांनाही त्यांचा विरह सहन होईना. तेही हळूहळू त्यांच्यामागे चालू लागले. अश्रुपूर्ण नयनांनी पांडुरंगाकडे प्रार्थना करत तुकाराम म्हणाले, ‘हे पांडुरंगा! माझा एवढा उबग का आला?’ सर्व उपस्थित वैष्णव जन भक्तांनाही ही प्रार्थना ऐकून त्यांचे डोळे पाणावले व अंत:करण सद्गदित झाले. तुकारामांना यापुढे चालणे अशक्मय झाले. त्यानंतर सर्व वैष्णवांनी नाईलाजाने तुकारामांचा भावपूर्ण अंत:करणाने निरोप घेतला.
जेव्हा या सर्व वैष्णवभक्तांनी टाळ, मृदंग, विणेच्या साथीने उच्च आवाजात उत्साहाने हरिनाम संकीर्तन केले, तेव्हा त्यांच्या या भगवद्प्रेमामुळे असे वाटत होते की सर्व दिव्य ध्वनी, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी पंढरपूरला एकत्र आले आहेत. पंढरपूरच्या पवित्र भूमीचा स्पर्श होताच सर्वांना अत्यानंद झाला. एकमेकांना दंडवत करून आलिंगन देऊन त्यांनी पंढरपुरात सर्वांचे स्वागत केले. सर्वांनी चंद्रभागेच्या शीतल जलामध्ये स्नान केले व काठावरील मंदिरात भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी मिळून नाचत हरिनाम गात पंढरपूरमध्ये नगर संकीर्तन केले. त्यानंतर महाद्वारासमोर येऊन सद्भावे दंडवत घातले.
मंदिराच्या आत आल्यानंतर सर्व भक्तांनी प्रेमपूर्वक तुकारामानी लिहिलेले चोवीस अभंग गऊड स्तंभाजवळ उभे राहून भगवंतासाठी वाचले. तुकारामांनी लिहिलेले अभंग भावपूर्ण होते आणि आदरपूर्वक भक्तिभावाने जेव्हा ते प्रेमळ भक्तांनी वाचले तेव्हा उपस्थित भक्तांना आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. तुकारामांचे भगवान श्रीकृष्णांवर किती प्रेम आहे व त्यांना भगवंताचा किती विरह वाटतो आहे हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रकट होत होते.
ते पत्र घेऊन रामेश्वर भट्ट, गंगाधर मावळ, संताजी तेली व इतर अनेक भक्त गर्भगृहात पांडुरंगासमोर आले. त्यांनी विटेवर उभा असलेल्या कानामध्ये मकर कुंडले, डोक्मयावर मुकुट, कमळासारखे नेत्र असलेल्या, कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पहात असलेल्या पांडुरंगाला सप्रेम आलिंगन दिले. नंतर आपले डोके त्यांच्या चरणावर ठेवून या चरणांचा कधी विसर पडू नये अशी आर्ततेने प्रार्थना केली.
तुकारामांचे पत्र पांडुरंगाच्या हातात देत भक्त म्हणाले, ‘तुकारामांची प्रकृती खूप खालावली आहे आणि इतक्मया दूरपर्यंत ते चालू शकत नाहीत म्हणून त्यांनी आपणासाठी हे पत्र लिहिले आहे. आपण भक्तवत्सल कऊणामूर्ती आहात, सर्वज्ञ आहात, आपणास आम्ही सांगण्यात गरज नाही आपण सर्व जाणता.’ तुकाराम आजारी आहेत हे ऐकून पांडुरंगाचे डोळे पाणावले. ऊक्मिणीला बाजूला बोलावून तिला म्हणाले, ‘तुकाराम हा माझा निजभक्त आहे. तो आजारी असल्याने इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणून त्याने पत्र पाठविले आहे, आपण दोघे बरोबरीने देहूला जाऊन त्याला भेटू.’ ही पांडुरंगाची विनंती ऐकून ऊक्मिणी म्हणाली, ‘आपणाला भेटण्यासाठी चोहोकडून अनंत भाविक भक्त आले आहेत. आपण जर येथून निघून गेलो तर सर्वजण दु:खी-कष्टी होतील तरी आपले वाहन गऊडाला पाठवून तुकारामांनाच येथवर आणावे असे मला वाटते.’
(उर्वरित लेख पुढील भागात)
-वृंदावनदास








