वयाच्या 110 व्या वर्षी निधन
वृत्तसंस्था/ खरगोन
मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये प्रसिद्ध संत 110 वर्षीय सियाराम बाब यांचे बुधवारी पहाटे 5 वाजता देहावसान झाले आहे. यासंबंधीचे वृत्त कळताच देशभरातील भाविकांना शोक पसरला आहे. भगवान हनुमान यांचे परमभक्त असलेले सियाराम बाबा हे मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सियाराम बाबा हे पूर्ण आयुष्य संन्यासी राहिले. त्यांचे मूळ नाव कुणालाच माहित नव्हते. पहिल्यांदा त्यांच्या मुखातून सियाराम हा शब्द बाहेर पडला होता आणि तेव्हापासून लोक त्यांना याच नावाने संबोधित होते. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी एका वृक्षाखाली एका पायावर उभे राहून 12 वर्षांपर्यंत तपस्या केली होती आणि यादरम्यान ते मौन साधनेत लीन राहिले होते अशी माहिती एका भाविकाने दिली आहे. सियाराम बाबा हे दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत एकाच ठिकाणी बसून नियमित स्वरुपात रामायणाचे पठण करायचे. नर्मदेचे संरक्षण, राम मंदिर निर्मिती आणि शिक्षणाकरता ते मोठी रक्कम दान करायचे.









