कँपमधील चर्चमध्ये विशेष प्रार्थना : आदर्शाचे अनुकरण करण्याचा सल्ला
बेळगाव : कँप भागातील सेंट अँथोनी चर्चमध्ये सेंट अँथोनी फेस्त उत्साहात साजरे करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवारी झाला. या निमित्त विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थनेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. फादर ऑल्विन सुधीर आणि फादर विजय मेंडिथ हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक प्रिस्ट्स आणि नन्सही उपस्थित होत्या. बिशप फर्नांडिस यांनी आपल्या सर्मनमध्ये सेंट अँथोनी यांच्या आध्यात्मिक जीवनातील महत्त्वाचे प्रसंग विषद केले. त्यांच्या आदर्श जीवनाचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. या कार्यक्रमाच्या आधी 12 दिवस नोव्हेना प्रार्थनाही करण्यात आल्या होत्या. ख्रिश्चनांप्रमाणेच अनेक भाविकांनी या 12 दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये उपस्थिती दर्शविली होती. सर्व भाविकांनी आणि उपस्थितांनी भक्तिभावे प्रार्थना करून सेंट अँथोनी यांचे आशीर्वाद घेतले. सेंट अँथोनी हे भक्तांना त्यांच्या संकटकाळात त्यांना साहाय्य करून त्यांची संकटे आणि दु:खे दूर करतात. त्यांच्या प्रार्थनांना उत्कट प्रतिसाद देतात, असे फादर विजय मेंडिथ यांनी प्रतिपादन केले.
प्रार्थनेनंतर मिरवणूक
सेंट फ्रान्सिस यांच्या मूर्तीची मिरवणूक प्रार्थनेच्या कार्यक्रमानंतर काढण्यात आली. सेंट अँथोनी यांनी त्यांच्या जीवनात केवळ 13 च नव्हे, तर असंख्य चमत्कार केले आहेत. पण आपण केवळ येथे त्यांच्या चमत्कारांसाठी आलो असू किंवा त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करत असू तर ती आपली चूक ठरेल. आपण येथे त्यांच्या पवित्र जीवनाला नमन करण्यासाठी आलो आहोत. चमत्कार करून दाखविणे हा त्यांच्या पवित्र जीवनाचा नैसर्गिक भाग होता. त्यांनी चमत्कार केले नव्हते, तर ते नैसर्गिकरीत्या त्यांच्या हातून घडले होते. त्यामुळे त्यांच्याकडून चमत्कारांची अपेक्षा करण्यापेक्षा आपणच त्यांच्या पवित्र जीवनाचे अनुकरण करून संत व्हावे. त्यानंतर आपल्याही हातून असे चमत्कार घडतील, असे प्रतिपादन बिशप फर्नांडिस यांनी उपस्थितांसमोर भक्तिभावाने केले.









