3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागे घेतला : तरीही सद्यस्थितीत धोका नाही : नायब सैनी सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पाठिंबा काढून घेणाऱ्या तीन आमदारांमध्ये सोंबीर सांगवान, धरमपाल गोंडर आणि रणधीर गोलेन यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे तिन्ही आमदारांनी मंगळवारी जाहीर केले. हरियाणात लोकसभेच्या सर्व दहा जागांसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मंगळवारी मोठी ताकद मिळाली.
हरियाणातील रोहतक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अपक्ष आमदार धरमपाल गोंडर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकरी आणि इतर समस्या लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हुडा त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
हरियाणातील 90 सदस्यीय विधानसभेत सध्या 88 आमदार असून त्यापैकी भाजपचे 40 आमदार आहेत. त्यांना आणखी तीन आमदारांचा पाठिंबा आहे. अशा स्थितीत बहुमताचा विचार करता सरकारकडे एक आमदार कमी आहे. तर विरोधकांकडे 45 आमदार आहेत. घटनातज्ञांच्या मते, भाजप सरकारला सध्या धोका नाही कारण विरोधक अद्याप बहुमत चाचणीची मागणी करू शकत नाहीत. कारण 12 मार्च रोजी सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नियमांनुसार, दोन बहुमत चाचण्यांमध्ये 6 महिन्यांचे अंतर आवश्यक आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष सप्टेंबरपूर्वी अविश्वास ठराव आणू शकत नाहीत. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे सद्यस्थितीत भाजपप्रणित सरकारला धोका नसल्याचे दिसत आहे.









