वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपाईन्स
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या भारताच्या सायना नेहवालने येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी दिली तर युवा खेळाडू लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. याशिवाय जपानचा अग्रमानांकित व संभाव्य विजेता मानल्या जाणाऱया केन्टो मोमोटाचे आव्हानही पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
सायनाने दक्षिण कोरियाच्या सिम युजिनचा 21-15, 17-21, 21-13 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया लक्ष्य सेनला चीनच्या लि शि फेंगने चकित केले. पाचव्या मानांकित लक्ष्य सेनला शि फेंगने 12-21, 21-10, 21-19 असे हरविले. 56 मिनिटे ही लढत रंगली होती. जागतिक 19 व्या मानांकित बी. साई प्रणीतलाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्याला इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीने 21-17, 21-13 असे हरविले. याशिवाय महिला एकेरीत भारताच्या आकर्षी कश्यपलाही स्पर्धेबाहेर पडावे लागले. जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीने 21-15, 21-9 असे तिला केवळ 26 मिनिटांत सहज नमवित आगेकूच केली.
महिला दुहेरीत भारताच्या दोन्ही जोडय़ांना पराभव स्वीकारावा लागला. अश्विनी भट व शिखा गौतम आणि सिमरन सिंघी व रितीका ठाकर यांचा त्यात समावेश आहे. अश्विनी-शिखा यांना मलेशियाच्या ऍना चिंग यिक चेआँग व तेओह मेई झिंग यांनी 21-19, 21-12 असे तर सिमरन-रितिका यांना मलेशियाच्या सातव्या मानांकित पियर्ली टॅन व मुरलीधरन थिनाह यांनी 21-15, 21-11 असे हरविले.
मोमोटाचा धक्कादायक पराभव
पुरुष एकेरीत जपानच्या अग्रमानांकित व दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन केन्टो मोमोटाला पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. जागतिक क्रमवारीत 52 व्या स्थानावर असणाऱया इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वी वार्डोयोने पहिला गेम गमविला तरी नंतरचे दोन गेम्स जिंकून मोमोटाचे आव्हान संपवले. वार्डोयोने 17-21, 21-17, 21-7 असे तासाभराच्या खेळात त्याला हरविले. मोमोटाला अलीकडे खराब फॉर्ममधून जावे लागत आहे. जानेवारी 2020 मध्ये कार अपघात झाल्यानंतर त्याला त्याआधीचा फॉर्म अजून गवसलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्येही तो लवकर पराभूत झाला होता. त्याला फक्त इंडोनेशिया मास्टर्स ही गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेली एकमेव स्पर्धा आतापर्यंत जिंकता आली आहे. डिसेंबरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून त्याने माघार घेतली तर गेल्या महिन्यात जर्मनी ओपन स्पर्धेत तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला आणि प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्याला उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नाही.









