कला, संस्कृती खात्याचे तृतीय पारितोषिक : माटोळी स्पर्धेत सहा वर्षांपासून सातत्याने यश

जगन्नाथ मुळवी /मडकई
फटाक्यांवर अवाढव्य खर्च व धुर प्रदुषण करून गणेशभक्तांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा, श्री गणेशालाच प्रिय असलेल्या माटोळीवर खर्च केल्यास भक्ती व श्रध्दा दृढ होईल. माटोळीतून अंगभूत कलेचे प्रदर्शन मांडल्यास जीवनाच्या प्रवासात तानाजी गावडेंनीही समाजाला काही दिलं हे समाधान मिळेल. या भावनेतून तानाजी माटोळीकडे वळले आणि कलासंस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या माटोळी स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी यावर्षी तृतीय पारितोषिक प्राप्त केले.
तळूले बांदोडा येथील अत्यंत गरिब कुटूंबात जन्मलेल्या तानाजी गावडे यांना शिक्षण घेण्यास अडचण येत असल्यामुळे गोमंतकाचे रंगकर्मी व शिक्षक श्रीधर कामत बांबोळकर यांनी त्याला स्नेह मंदिराची शिष्यवृत्ती प्राप्त करून दिल्यामुळे तानाजींना उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत शिक्षण घेता आले. इलेट्रीकल इंजिनियर होण्याचे स्वप्न बाळगणाऱया तानाजींना घरच्या परिस्थितीमुळे कठीण होऊन बसले. आयटीआय करून त्यांनी औद्योगीक वासहतीत नोकरी धरली. उराशी बाळगलेल इलेट्रीकल इंजिनियर बनण्याचे स्वप्न जिद्द व चिकाटीने पुर्णत्त्वास नेले. वयाच्या 24व्या वर्षी विचारांमध्ये प्रगल्भता आणून फटाके मारण्याचा मोह टाळला आणि समर्पित वृत्तीने कलेत वाहुन घेतले. वेतनातील दर महिन्याला 1 टक्का बाजूला काढून तो माटोळीवर खर्च करू लागला. गेली सहा वर्षे सातत्याने तानाजी गावडे यांनी माटोळी स्पर्धेत उतरून कला संस्कृती खात्याची उत्तेजनार्थची पारितोषिके प्राप्त केली.
माटोळी कलेत तानाजीने स्वतःची प्रतिभा निर्माण करण्यासाठी गोमंतकाचे प्रतिभावंत नाटय़ कलाकार व रंगकर्मी अजित केरकर यांनी त्याला श्रीकांत सतरकर यांचा परिचय करून दिला व तानाजींना या कलेत मार्गदर्शन करण्यासाठी सतरकर यांना विनंती केली. तानाजी यांनी “जास्वंदीचे फुल, शिवलींग, श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज, मुशकराज’’ अशा प्रतिकृती माटोळीतून निर्माण केल्या व स्पर्धेत सातत्याने उत्तेजनार्थची पारितोषिके मिळवली. यंदा ‘श्री साईबाबां’ची प्रतिकृती निर्माण करून त्यांनी या स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केले.
288 औषधी वनस्पती व फळे यांचा वापर त्यांनी या माटोळीसाठी केलेला आहे. गोव्याच्या रानावनात भटकताना त्यांनी चोर्ला घाट व मोर्ले केरी आदी भाग पिजून काढून ही फळे व वनस्पती गोळा केली. वैदीक पंरपरा राबविताना ऋषीमुनींनी निर्माण केलेली ही फळे व वनस्पती नागरिकांच्या दृष्टीआड होत गेली होती. त्यांचा गोमंतकीयांना परत एकदा माटोळीच्या माध्यमातून परिचय व्हावा म्हणून तानाजी गावडे यांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य व कौतुकास्पद आहे. अत्यंत दुर्मिळ असलेली वनस्पती व फळे त्यांनी या माटोळीसाठी वापरलेली आहे. कडधान्याचाही वापर केलेला आहे.
कोरोना काळातला अपवाद वगळल्यास सातत्याने तो माटोळी स्पर्धेत उतरत राहिला. यशही त्याला गवसत राहिले. त्याची ही धडपड पाहून विष्णूकांत गावडे, शैलेश, मुकेश, सर्वेश, चेतन, नंदीश, मंगेश, दत्तप्रसाद, रोहन, रजत गावडे, सागर नाईक मुळे, अमोघ बुडकूले व दीपक गांवकर या मित्र परिवारांचे त्याला सहकार्य मिळत गेले. या कलेत ज्यांचे सहकार्य लाभले त्यांच्या ऋणात राहण्यातच तानाजी गावडे यांना धन्यता वाटत आहे…!









