के. आर. शेट्टी निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साई स्पोर्ट्स, शीतल राम शेट्टी, मराठा स्पोर्ट्स ग्रामीण व आयटीसी स्पोर्ट्स संघांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. उमर, अभिजीत कुट्रे, अक्षय पाटील, यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कांतारा बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 53 धावा केल्या. त्यात प्रसन्ना शेट्टीने 3 चौकारासह 22, रवी कोप्पळने 11 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे नागराज व अजिम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्सने 5.3 षटकात 2 गडी बाद 56 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात जावेदने 1 षटकार, 3 चौकारासह 26, हर्षने 2 षटकार 2 चौकारासह 23 धावा केल्या. कांतारातर्फे प्रसन्ना व प्रवीण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात शाहबाजने 18, नदीमने 17 धावा केल्या. शीतल राम शेट्टीतर्फे अक्षय पाटीलने 10 धावात 3 तर अक्षयने 25 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शीतल राम शेट्टी संघाने 8 षटकात 3 गडी बाद 72 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात प्रवीणने 2 षटकारसह 22 तर अक्षय पाटीलने 17 धावा केल्या. बालाजीतर्फे राज केतनने 2 तर गणेशने 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात श्रीराम स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 69 धावा केल्या. त्यात प्रवीणने 20 तर दऱ्याप्पाने 19 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्स ग्रामीणतर्फे सुधीर गवळीने 11 धावात 3 तर सुनीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने 6.4 षटकात 3 गडी बाद 70 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अभिजीत कुट्रेने 1 षटकार 5 चौकारासह 38 तर अभिजीत पाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 25 धावा केल्या. श्रीरामतर्फे शशीने 24 धावात 2 तर सुरेशने 1 गडी बाद केला.
शेवटच्या सामन्यात आयटीसी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात उमरने 4 षटकारासह 37 तर तबरेज गोरीने 14 धावा केल्या. आर्यन स्पोर्ट्सतर्फे मोहम्मद 21 धावात 3 तर नारायणने 10 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्यन स्पोर्ट्सने 8 षटकात 7 गडी बाद 48 धावा केल्या. त्यात बकुलने 16 तर मोहसीनने 10 धावा केल्या. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सामनावीर अभिजीत कुट्रे, उमर, मोहिद, अक्षय पाटील तर इंम्पॅक्ट खेळाडू प्रसन्ना शेट्टी, आर्यन उपाध्यय, अभिजीत पाटील, शोहब यांना चषक देऊन गौरविण्यात आले. शनिवारी व रविवारी स्पर्धेला सुटी आहे. रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यात रंगतदार सामना असल्याकारणामुळे सुटी करण्यात आली आहे.









