भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा विश्वास : दापोलीत उपविभागीय अधिकाऱ्यांची घेतली भेट
प्रतिनिधी/दापोली
दापोली तालुक्यातील मुरुड येथे अनधिकृतितरित्या बांधलेले साई रिसाॅर्ट नवरात्रीनंतर दसऱ्याच्या मुहुर्तावर कोसळेल, असा विश्वास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
साई रिसाॅर्ट पाडण्याच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या गुरूवारी दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, साई रिसाॅर्ट हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. कोविड काळात पालकमंत्री अनिल परब यांनी हे साई रिसाॅर्ट उभे केले. 5 मार्च 2020 रोजी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात विजेची मागणी स्वतःच्या नावाने केली होती. यानंतर त्यांनी साई रिसाॉर्ट बांधले व तेच रिसाॉर्ट आप्पा कदम यांना विकले. या बाबत जागेचे मूळ मालक यांनीदेखील लेखी स्वरूपात त्यांचा जबाब दिला आहे.
साई रिसाॉर्ट पाडण्याच्या कामासाठी कन्सल्टंट नेमण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. यानंतर नवरात्रीमध्ये पुन्हा निविदा काढण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात होईल. हे काम सात दिवसांच्या आत पूर्ण होईल व दसऱ्याला साई रिसाॅर्ट पाडण्याचे काम सुरू होईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. तसेच येथे बांधलेले सी कोंच हे बेनामी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. याचे मालक हे ओएनजीसीमध्ये नोकरीला आहेत. सध्या ते नायजेरिया येथे आहेत. त्यांना फरार घोषित करावे, अशी मागणी आपण पोलिसांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.