सौरभ शुक्ला-रणवीर शौरी झळकणार
सौरभ शुक्ला आणि रणवीर शौरी हे दोन्ही कलाकार आता एका डार्क गँगस्टर कॉमेडी सीरिजमध्ये दिसून येणार आहेत. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. दावन परिवाराचा प्रमुख म्हणजेच बडा दावन स्वत:च राजकीय कारकीर्द सुरू करू इच्छित असताना पोलीस त्याला अटक करतात. आता परिवार बडे दावनला तुरुंगातून बाहेर कसे काढतात यावर याची कहाणी गुंफण्यात आली आहे.
सत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या परिवाराची ही कहाणी आहे. माझी भूमिका बडा दावन एकीकडे स्वत:च्या नातेवाईकांनाच घाबरत असतो. तसेच ते लोक त्याचा सन्मानही करतात. या गोष्टी सीरिजमध्ये विनोदाची पेरणी करतात. ही सीरिज मानवी स्वभावाला सहजपणे दाखविते. यातील व्यक्तिरेखा स्वत:ला गांभीर्याने घेत नसल्यानेच यात अनेक पैलू आहेत, असे सौरभ शुक्ला यांनी म्हटले आहे.
‘बिंदिया के बाहुबली’चे लेखन प्रभावी आहे. या सीरिजमधील जग गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वत:चा एक अजेंडा असल्याचे रणवीर शौरीने सांगितले आहे. या सीरिजमध्ये सीमा विश्वास, सुशांत सिंह, शीबा चड्ढा, सई ताम्हणकर, तनिष्ठा चटर्जी, विनीत कुमार, दिव्येंदु भट्टाचार्य आणि आकाश दहिया हे कलाकार दिसून येणार आहेत. ही सीरिज अमेझॉन एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे.









