बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने के. आर. शेट्टी किंग्स संघाचा नऊ गड्यांनी तर जेवर गॅलरी डायमंड संघाने मॅक्स आनंद अकॅडमी संघाचा 35 धावांनी पराभव विजयी सलामी दिली. साईराज पोरवाल, मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे तिप्पणा कुंदरनाड, लक्ष्मी कुंदरनाड यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड विकास देसाई, आशिष चव्हाण युनियन जिमखाना अध्यक्ष प्रसन्न सुंठणकर, संचालक सुधाकर पाटणकर संघमालक मोहम्मद ताहीर सराफ, रोहित पोरवाल, प्रदीप शेरीगार, संगम पाटील, मिलिंद चव्हाण, महांतेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिला सामन्यात प्रथम फलंदाजी करताना के. आर. शेट्टी किंग्स संघाने 24.1 षटकात सर्व बाद 116 धावा केल्या. त्यात हर्षजीत बोकडेने 37, दैविक मूकबस्तने 14 धावा केल्या. साई फार्मतर्फे कर्णधार साईराज पोरवालने 3, सुप्रीत बुरुड व सुहास हिरेकोडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 16.5 षटकात एक बाद 117 धावा करत हा सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात कर्णधार साईराज पोरवालने चौफेर टोलेबाजी करताना 58 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 66 धावा, प्रणव जेने 19 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात जेवर गॅलरी डायमंड संघाने मॅक्स आनंद अकॅडमी संघाचा पराभव केला. जेवर गॅलरी डायमंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात पाच बाद 159 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद हमझाने 3 चौकारांसह 54, सचिन तळवारने 3 चौकार एक षटकारांसह 37 तर विवान भूसदने नाबाद 18 धावा केल्या.
मॅक्स आनंद अकादमीतर्फे शिवम काटवे व ऋषभ आर. एन. प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅक्स आनंद अकॅडमी संघाने 24.4 षटकात सर्व बाद 125 धावा केल्या. अद्वैत चव्हाणने 3 चौकारांसह 36, यश ठाकूरने 2 चौकार एक षटकार 24, आरुष देसुरकरने 19 धावा केला. जेवर गॅलरी तर्फे विवान भूसदने 3 मोहम्मद हमजाने 2 गडी बाद केले. सामनावीर साईराज पोरवाल व इम्पॅक्ट खेळाडू सुहास हिरेकोडी यांना प्रमुख पाहुणे महेश कुलकर्णी, संजय पाटील, आनंद चौगुले व शितल तिप्पणाचे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील, समीर किल्लेदार व एस. के. राठोड यांच्या हस्ते सामनावीर मोहम्मद हमजा व इम्पॅक्ट खेळाडू विवान भूसद यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.









