चिपळूण :
सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब रामा भुवड (80) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सह्याद्री परिवारावर शोककळा पसरली आहे. शनिवारी संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डे येथे आयोजित करण्यात आलेला अभीष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला.
बाबासाहेब भुवड हे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे हायस्कूलमधील सुरुवातीच्या बॅचचे विद्यार्थी. शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्याने शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम, अनुराधाताई निकम यांनी त्यांचे पालनपोषण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते संस्थेच्या हायस्कूलमध्येच शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे ते मुख्याध्यापक म्हणून वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालय असुर्डे–आंबतखोल तसेच खेर्डी–चिंचघरी हायस्कूलमध्ये सेवा बजावत निवृत्त झाले. यानंतर ते सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर संचालक, उपाध्यक्ष झाले. अनुराधाताई निकम यांचे निधन झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी आजतागायत सांभाळली. आगवे गावचे सरपंचपद तसेच आगवे तंटामुक्त समिती अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भुवड हे सकाळीच आमदार निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यानुसार शनिवारी सकाळी वाढदिवसासाठी येत असताना त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. भुवड यांच्या निधनाने सह्याद्री शिक्षण संस्था परिवारावर शोककळा पसरली आहे.
आमदार निकम यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री परिवाराने सावर्डे येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित केलेला अभीष्टचिंतन सोहळा, तसेच वाढदिवसाचे इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्याचबरोबर आमदार निकम यांनीही शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि भुवड यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शनिवारी सायंकाळी आगवे येथील स्मशानभूमीत बाबासाहेब भुवड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह सह्याद्री परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. भुवड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.








