ता. पं.समोर सरकारी पार्किंगऐवजी खासगी वाहनांचीच भाऊगर्दी : अधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी : शुल्क आकारणी करण्याचा पर्याय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर खासगी वाहन चालक व मालकांची वाहने पार्किंग करण्याचे प्रकार नित्याचेच ठरले आहे. याचा फटका ता. पं. अधिकारी तसेच इतर अधिकाऱयांच्या वाहनांना बसत आहे. त्यांना इतरत्र पार्किंग करून कार्यालयात यावे लागत आहे. याबाबत अधिकाऱयांनी सांगूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था सध्या ता. पं.ची झाली आहे. साहेब दौऱयावर आणि खासगी वाहने पार्किंगसाठी कार्यालयासमोर लावण्यात येत आहेत. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी अधिकारी मात्र दौरे करण्यातच धन्यता मानत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी खासगी वाहनांना येथे प्रवेशबंदी केली होती. मात्र, सध्या अधिकाऱयांनी सर्वच गोष्टीत मौन बाळगून आपली खुर्ची शाबुत ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अधिकाऱयांनाच धमकावण्याचे प्रकार
ता. पं. कार्यालयासमोर दिव्यांगांसाठी एक कार्यालय आहे. या ठिकाणी व तालुका पंचायतमध्ये वारंवार वर्दळ असते. या ठिकाणी खासगी वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने दिव्यांगांनी आणलेली वाहने कोठे पार्किंग करावीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत अधिकाऱयांनी सूचना करूनही काही जण लोकप्रतिनिधींच्या नावे अधिकाऱयांनाच धमकावत असल्याचे प्रकार घडत आहेत.
ता. पं. कार्यालयासमोर इतर बरीच कार्यालये आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दी वारंवार या ठिकाणी होत असते. काही खासगी सावकारही या ठिकाणी वाहने पार्किंग करून दिवसभर आपले सर्व व्यवहार पूर्ण करून सायंकाळी वाहने घेऊन जातात. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याची मागणी होत असताना या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारावे, अशी मागणीही होत आहे.
या ठिकाणी वाहने पार्किंग करणाऱया वाहनचालकांना येथे पार्किंग करू नका, असे सांगितल्यावर साहेबांची वाहने आहेत, अथवा मोठय़ा अधिकाऱयांची वाहने आहेत, असे सांगून धमकावण्याचा प्रकार सुरू असतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दुचाकींचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









